उबाठाच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेनेची तर शरद पवारांच्या कन्याप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाली, हा प्रचारही मतदारांना भावण्यासारखाच आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ विरुद्ध महालक्ष्मी हा सामना बऱ्यापैकी रंगू शकतो.
महाराष्ट्र कोण जिंकतेय हे पुढील दहा बारा दिवसात स्पष्ट होईल. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी असो वा वेगवेगळ्या राज्यांमध्ये बिघडतच चाललेल्या विरोधी 'इडी' आघाडीसाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकणे एवढे अनिवार्य होऊन बसले आहे की त्यासाठी काही म्हणजे काहीही करायची त्यांची तयारी दिसते. प्रत्यक्ष मतदान जेवढे जवळ येत आहे, त्या प्रमाणात दोन्ही आघाड्यांकडून मतदारांवर आश्वासनांची जी खैरात केली जात आहे ते पाहता मतदारांसाठी आता याहून आणखी अधिक काय हवे हे कळायला मार्ग नाही. लाडकी बहीण काय, महालक्ष्मी योजना काय, लाडका भाऊ, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्याच घटकांसाठी दोन्ही म्हणजे सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने आश्वासनांच्या थैल्यांच्या थैल्या सर्वसामान्य मतदारांच्या घरोघर पोचवून त्यांच्यासाठी हे राज्य जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हेच प्रामुख्याने अधोरेखित केले आहे. हरयाणानंतर भाजपप्रणीत आघाडीने महाराष्ट्रही जिंकला तर ते त्यांच्यासाठी 'सोने पे सुहागा' ठरेल तर महाराष्ट्रही गमावल्यास 'इंडी' आघाडीच्या भवितव्याच्यादृष्टीने ते खूपच मारक ठरू शकेल. अशा परिस्थितीत 'काहीही मागा, सगळे काही देऊ' हाच या निवडणुकीत दोन्ही पक्षांचा अघोषित असा खरा नारा असल्याचे दिसून येते. ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने दिवाळी संपली असली तरी दिवाळीच्या त्याच जल्लोषाचे रूपांतर आज प्रचाराच्या रणधुमाळीत झालेले दिसते आणि अजून काही दिवस हा जल्लोष कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात मागील दोन अडीच वर्षे सत्तेवर असलेल्या महायुतीने निवडणुकीची आचारसंहिता प्रत्यक्ष सुरू होण्याआधीच लोकहिताच्यादृष्टीने घेतलेले अनेक निर्णय आणि त्यास संकल्पपत्रातून दिलेली आश्वासनांची जोड यामुळे आजच्या घडीला निदान महायुतीचे पारडे काही प्रमाणात जड असल्याचे एकूण चित्र दिसते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी जी धडपड करावी लागत आहे, ती पाहता त्यांना पुढील सात आठ दिवसात असा काही चमत्कार करावा लागेल की मतदार त्यांच्या अधिक जवळ येईल. पण असा चमत्कार करण्यासाठी काँग्रेसकडे वा उबाठाकडेही नेता नाही. राहुल गांधींचे 'खटाखट' मशीन महाराष्ट्रात चालेल असे वाटत नाही, त्यामुळेच राहुल गांधींना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यातच आपले हित आहे असे महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मित्र पक्षांना वाटत आहे. उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यावर उघडपणे बोलू शकत नाहीत आणि त्यामुळे अधिकच अडचणीत आले आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावर राहुल गांधींनी महाराष्ट्रात निदान दोन शब्द चांगले बोलावे यासाठी उद्धवजी त्यांच्याशी बोलतील काय, असा थेट सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उबाठाला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. उद्धव ठाकरेंसासाठी हे आव्हान म्हणजे 'सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही' अशा प्रकारचे दुखणे ठरले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मतदारांसाठी आश्वासने तर अगदी भरभरून दिली आहेत, पण आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ऐन निवडणुकीत जो समन्वय दिसून यायला हवा होता, तो दिसून येत नाही. आम्ही समन्वयाने काम करत असल्याचा आभास तर या आभासी जगात त्यांच्याकडून दाखवला जात आहे, पण एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार प्रत्यक्ष मतदानाच्या टप्प्यात होतील याची भीती तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. उबाठा शिवसेनेने सगळ्यांनाच समान जागा मिळाव्यात यासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला पण काँग्रेसने शेवटी आपणच मोठा भाऊ असल्याचे शंभरावर जागा मिळवून उबाठाचे संजय राऊत आदींचा रोष ओढवून घेतला. हा वाद येथेच थांबेल असा समज कोणी करून घेणार असेल तर काय सांगावे? आपल्याला मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा म्हणून नाव घोषित करावे यासाठी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महिनाभर दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना कोणी जुमानले नाही वा गांभीर्याने घेतले नाही. याकामी त्यांचे मित्र शरद पवार हेही त्यांना काही मदत करू शकले नाहीत. काँग्रेसकडून नाना पटोले आणि राष्ट्रवादी (शप) कडून सुप्रिया सुळे आधीच मुख्यमंत्रिपदाच्या रिंगणात बाशिंग बांधून तयार असल्याने उबाठाची डाळ शिजणे कठीणच होते. आता त्यांचे नाव जाहीर झाले असते तर उबाठाच्या शिवसेनेला त्याचा फायदा झाला असता यात संदेह नाही, पण काँग्रेसने त्यांचा खेळच पूर्णपणे उधळून लावला. तसे करणे स्वत:च्या पायावरच धोंडा घालून घेण्यासारखे ठरले असते. त्याची भरपाई उबाठा शिवसेनेकडून प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी केली जाणारच नाही असे कोणी छातीठोकपणे आज सांगू शकेल, असे वाटत नाही.
महायुतीबाबतीत म्हणाल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हा त्यांच्यासाठी कच्चा दुवा आहे. त्यांचे काका शरद पवार हे आपले भावनिक कार्ड खेळत अजित पवारांवर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ताण करतील अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत. बारामतीत तर शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या जवान पुतण्याला उभे करून अजितदादांची गोची केली आहे. महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली नाही तर त्यामागे अजितदादांचा राष्ट्रवादी हेच एकमेव कारण असू शकते. अन्य आघाड्यांवर महायुतीची दौड जोरात चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आदींनी प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना तर चारही बाजूंनी घेरले आहे. सावरकर यांच्यावर उपस्थित केलेला सवाल असो वा काश्मीरमधील ३७० कलमावरून काँग्रेस आणि मित्रपक्ष जो तमाशा करत आहेत वा धुडगूस घालत आहेत, त्यावर निदान उबाठाने भूमिका घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. अयोध्येत उभारल्या गेलेल्या राममंदिरास विरोध करणारे आणि वक्फ बोर्डाबाबत योग्य बाजू न घेणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना बसली आहे, यावरच प्रामुख्याने महायुतीने प्रचारात जो भर दिला आहे, तोही बाळासाहेबांची 'मशाल' घेऊन फिरत असलेल्यांना खूपच अडचणींचा ठरू शकेल. उबाठाच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेनेची तर शरद पवारांच्या कन्याप्रेमामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची शकले झाली, हा प्रचारही मतदारांना भावण्यासारखाच आहे. अशा परिस्थितीतही महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ विरुद्ध ‘महालक्ष्मी’ हा सामना बऱ्यापैकी रंगू शकतो. मुख्यमंत्रिपदासाठी प्रत्यक्ष मतदानात कोण कोणावर कुरघोडी करेल, यावरही बरेच काही अवलंबून आहे.
वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९