अखेरचा हा तुला दंडवत

“कुमुद तुला माहीत आहे, तू वीस वर्षांपूर्वी केलेली चूक कोणीही विसरू शकत नाही.” आता मात्र कुमुदचं रडणं थांबलं. ती पुन्हा एकदा अबोल झाली. संजय बोलत होता आणि त्याचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर हजार घाव घालत होता.

Story: कथा |
10th November, 03:49 am
अखेरचा हा तुला दंडवत

 संजय! बावारीचं लग्न ठरलंय???”

“मी काय विचारतेय? खरं आहे का हे?”

तो रागातच... “हो! ठरलंय!”

“मग मला कधी कळणार? मी आई आहे तिची! माझ्या मुलीविषयी असलेली अत्यंत महत्त्वाची अशी खबर मला लोकांकडे समजते? का?” नेहमी शांत असणारी कुमुद आज जरा मोठ्या आवाजात बोलत होती. 

संजय मोबाईल ठेवून शांतपणे उत्तरला, “हे बघ कुमुद, तुला अगोदर काहीच सांगायचं नाहीं असं सर्वांचंच ठरलं होतं आणि मुळात बावरीलाच नको होतं.”

एवढं सांगून तो निघून गेला. कुमुद मात्र शून्यात हरवून कसला तरी विचार करत होती. 

काही वेळात ती बैठकीच्या खोलीत आली तर तिला सासू-सासऱ्याचं बोलणं ऐकू आलं, “आमच्या बावरीचं लग्न धुमधडाक्यात लावू.” कुमुदला पाहून मात्र त्यांचं तोंड उतरलं. स्वयंपाकघरात भांड्यांचा ढीग होता. सगळं आवरून तिने भाजीची भांडी उघडून पाहिली, भाजी जशास तशी होती. हे नेहमीचंच होतं. तिच्या हातचं कुणीही काहीही खाईना. दुपार सरली. तिच्या मनात विचारांनी थैमान मांडलं होतं. तिला कशीच चैन पडेना. ती सरळ उठून आईकडे माहेरी निघून आली. ती नेहमी अशीच करायची. मन बेचैन झालं की आईकडे निघून यायची. पंधरा दिवस, महिना महिना राहायची. पण कधीही कुणी तिची चौकशी करत नसत. बावारी सुद्धा, “आई कुठे गेली?” म्हणून विचारायची नाही. अगदी लहानपणापासून. 

एरवी उदासलेली कुमुद, आईला आज जरा आणखीच खचलेली दिसली. जेवणाची तयारीही आईनेच केली. “कुमुद जेऊन घे बाळा. जेवण गार होतंय.” आईला चिंता वाटत होती. “नाही आई, आज जेवण नको.” कुमुदच्या मनात एक वादळ उठलं होतं. “सगळं नीट होईल कुमुद, तू चिंता करू नकोस.” “आई, बावरीचं लग्न ठरलंय गं, पुढच्या महिन्यात आणि मला काहीच माहीत नाही. आई, का वागतात गं हे असे? त्या गोष्टीला वीस वर्षे उलटून गेली तरीही! त्या एका क्षणात मी सर्व काही गमावलं आई!” आईच्या मांडीत तोंड घालून ती जोरजोरात रडते. “बाळ रडू नकोस. जे झालं त्याला कुणी बदलू शकतो का? तू धीट रहा.” त्या रात्री कुमुदच्या डोळ्याला डोळा लागला नाही.

तारुण्यात हसत खेळत असणारी कुमुद एवढी शांत होणार असं कुणालाही वाटलं नव्हतं. लग्नाची सुंदर सुंदर स्वप्नं रंगावली होती. संजय तिला कॉलेजमध्ये आवडायचा. पण तिने ह्या बाबतीत कधीही आगाऊपणा केला नाही. कॉलेज संपताच त्याच्याच घरून तिला मागणी आली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. लग्न झालं आणि सुखाचा संसार सुरु झाला. संजय तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तोच संजय आज मात्र तिचं तोंडही पाहायला तयार नव्हता. 

चार दिवस आईकडे राहून ती घरी आली. सगळं घर कसं बहरून गेलं होतं. सगळेच आनंदात होते. टेबलवरत पत्रिकेचा ढीग होता. तिने एक पत्रिका उचललीच होती, इतक्यात सासू ओरडली, “अगं कपाळफुटके! देवालाही नाही ठेवली अजून आणि तू तुझ्या अशुभ हाताने स्पर्श करतेस?” ती तशीच रूममध्ये निघून आली. तिला ह्या सर्व तिरस्कारांची सवय होती. आता रडायचं नाही असं तिने ठरवलं होतं. 

“संजय मी येते देवळात.” दुसऱ्या दिवशी सकाळी उठून, तयार होऊन तिने संजयला सांगितलं. “बावरीला आवडेल?” संजयने शंका व्यक्त केली. “आवडायचं काय? मी आई आहे तिची! एवढं तरी करू दे.” ती काकुळतीला आली. “बाबा मला ही बाई कशातच नको आहे.” संजय काही बोलणार तोच बावरीने आपला निर्णय दिला. कुमुद पुन्हा एकदा खचून गेली.

“संजय का? का करतात माझ्या एवढा तिरस्कार?” 

“कुमुद तुला माहीत आहे, तू वीस वर्षांपूर्वी केलेली चूक कोणीही विसरू शकत नाही.” आता मात्र कुमुदचं रडणं थांबलं. ती पुन्हा एकदा अबोल झाली. संजय बोलत होता आणि त्याचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर हजार घाव घालत होता. “तो कोवळा जीव आजही माझ्या डोळ्यांपुढे येतो. नुकताच हसायला शिकला होता. हुंकार देत होता. काय चूक होती गं त्याची? तू त्याला सांभाळू शकली नाहीस. तुझ्या चुकीमुळे तो गेला. माझा शंतनू गेला.” संजय ढसाढसा रडायला लागला. एरव्ही रागातच असणाऱ्या संजयला आज किती वर्षांनी ती रडताना पाहत होती. 

शंतनू... त्यांचा तीन महिन्यांचा बाळ वीस वर्षांपूर्वी गेला...

 कुमुद पुन्हा एकदा विचारात मग्न झाली. तिला खूप काही सांगायचं होतं मात्र या क्षणी काहीच सांगायचं नव्हतं. ती उठली, अन चालत राहिली. रस्त्यावर गाड्या भरधाव वेगाने ये जा करीत होत्या. ती मात्र बेभान होऊन चालली होती. रस्त्यावरच्या वर्दळीपेक्षा तिच्या मनातलं वादळ खूप मोठं होतं. एकदम ‘धडाम’ असा आवाज झाला. कुमुदच्या डोक्यातून, नाकातून, कानातून रक्त वाहत होतं. ऑफिसमध्ये पोहोचताच संजयचा फोन वाजला. संजय घाईघाईतच निघाला.

“सिस्टर, कुमुद सावंत?” संजयने घाबरतच विचारले. “ हो त्यांचा ऑपरेशन झालं आहे त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आहे.” तो आयसीयूच्या बाहेर पोहोचतात डॉक्टर बाहेर आल्या. “ मिस्टर संजय तुम्ही केबिनमध्ये या. डॉक्टरनी आपल्याला नावाने हाक मारण्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायच्या अगोदर त्याने दाराच्या काचेतून तिला पाहिलं. देव जाणे कशाला, पण त्याला आज ती त्याची वीस वर्षांपूर्वीची कुमुद वाटू लागली.

 तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचला. डॉक्टरांचे डोळे जरा पाणावले होते. त्या म्हणाल्या, “ मिस्टर संजय, कुमुदची कंडिशन क्रिटीकल आहे तुम्ही घरच्यांना बोलवून घ्या आम्ही सर्जरी केली आहे पण अति रक्तस्त्रावामुळे ती कोमात गेली आहे.” संजयच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी त्याला वाटू लागली. डॉक्टर पुढे बोलल्या, “कुमुद आमच्यासाठी, आमच्या हॉस्पिटलसाठी एक महत्त्वाची अशी व्यक्ती होती.” डॉक्टर जे काही बोलत होत्या ते संजयच्या समजण्यापलीकडे होतं कारण या वीस वर्षात त्यांनी कधीच कुमदच्या आयुष्यात डोकावलं नव्हतं. 

“वीस वर्षांपासून ती आमच्यासोबत आहे. निस्वार्थीपणे तिने आजपर्यंत कित्येक जीव वाचवले आहेत. रक्तदान, अनाथांची सेवा करणं, म्हाताऱ्यांना, छोट्या मुलांना औषध पाजणं सगळं काम ती करायची. आमच्या चिल्ड्रन्स वॉर्डची तर ती आईच आहे. कुमुद जेव्हा हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा कसे सगळेच आनंदीत असायचे. मिस्टर संजय, तुम्हाला तर माहीत असणार ती वीस वर्षांपूर्वी त्या रात्रीच्या प्रकरणातील हादरून गेली होती. तुमच्या मुलीच्या चुकीमुळे गमावलेलं बाळ...” संजयने पुढचे शब्द ऐकलेच नाहीत त्याचे कान एकदम बधीर झाले. मुलीच्या चुकीमुळे गमावलेलं बाळ!!! म्हणजे बावरीच्या चुकीमुळे गमावलेला शंतनू? तो एकदम भानावर आला.

“ डॉक्टर सांगा ना! त्या रात्री काय?? काय झालं होतं त्या रात्रीत???” डॉक्टरने आश्चर्याने विचारलं, “मिस्टर संजय तुम्हाला खरंच माहीत नाही?” “नाही डॉक्टर, प्लीज मला सांगा ना!” त्याने हात जोडून विनवण्या केल्या.

“ त्या रात्री जेव्हा तुम्ही सर्वजण त्या बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलात तेव्हा सगळे रडत होता, पण ती रडली नाही. तिला पाहिल्यावर मला समजलं की, काहीतरी आहे. मूल तर गेलंच होतं. मी चौकशी केली पण ती अबोलच राहिली. सलग एक महिना मी तिच्या पाठीशी होते पण ती काहीच बोलली नाही. मूल गुदमरून गेलं आणि ते तिच्यामुळे गेलं एवढंच ती सांगायची. सगळे तिचा तिरस्कार करायचे ती मात्र शांत होती एक दिवस तिला घरी बोलून जरा रागातच म्हणाले, ‘तू काही बोलली नाहीस, तर तुझा मुलगा गेला ना, तशी तुझी मुलगी पण जाईल. मग बस रडत.’ तिला राग आला आणि रागाच्या भरात ती बोलती झाली. ती बोलली, “डॉक्टर सर्व काही मजेत होतं. शंतनू हसायला लागला होता. हुंकार देत होता. घरात सगळे आनंदीत होते पण माझ्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. त्या रात्री मी शंतनुला घेऊन झोपले होते. मध्यरात्री त्याला पाजायला उठले पण तो दिसत नव्हता. माझं लक्ष बावरीकडे गेलं. पाच वर्षांची बावरी नेहमी म्हणायची, ‘मी माझ्या भावाला कुशीत घेऊन झोपणार.’ मी जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसेना. ती शंतनुला घट्ट मिठीत पकडून झोपली होती. मी तिला कुशीला सारलं. माझं काळीज धडधडत होतं. शंतनुची काहीच हालचाल नव्हती. मी घाबरतच त्याच्या डोक्याला स्पर्श केला तो गार होता. सैरभैर होऊन अंगावर हात फिरवला कुठेच काही हालचाल नव्हती. माझ्यातली आई मोठमोठ्याने रडत होती धडपडत होती पण फक्त एकाच क्षणाला. दुसऱ्याच क्षणी मुलीच्या विचाराने घेरले. एक मूल तर गेलंच आहे जर सर्वांना कळलं की बावरीमुळे शंतनू गेला तर आयुष्यभर तिच्यावर ‘भावखायरी’ म्हणून डाग लागणार. तिला तिरस्काराचं जगणं कसं द्यायचं? आम्ही माफ केलं तरी ती स्वत:ला कशी माफ करणार? मी शंतनुची माफी मागितली व त्याला कुशीत घेतलं. बावरी निरागसपणे झोपली होती. सकाळी मी बाळ उठत नाही एवढंच सांगितलं आणि एकच आक्रोश केला. सर्वांनी प्रश्नांचे तीर सोडले. मी मात्र अबोल राहिले. माझ्या मुलीवरचा ‘भावखायरी’ हा कलंक काढून मी माझ्यावरती सगळे आरोप घेतले.”

“ ती वीस वर्षांपासून हे सगळे मनात ठेवून आहे. माझ्याकडून सुद्धा तिने हेच वचन घेतलं होतं. आज ती...” डॉक्टर बोलत होती पण संजय मात्र केबिनमधून बाहेर पडला होता. दहा मीटर अंतरावर असलेला आयसीयू रूम त्याला शंभर कोस दूर असल्यासारखं भासत होता. त्या रात्री त्यांनी काय गमावलं हे त्याला आता समजत होतं.

वीस वर्षे कुमुदचा केलेला तिरस्कार... बायको म्हणून कधी जवळ घेतलं नाही, की साधं बोलणं नाही. “तुझी आई कपाळकरंटी. तुझ्या भावाला खाल्लं, आता तुलाही खाणार. नको जाऊ तिच्याकडे.” आईचे सततचे टोमणे तिला टोचत होते सगळं काही तिने एकटीने सहन केलं. कुशीत घेऊन विचारलं असतं, तर सांगितलं असतं का तिने? देव जाणे! आता तिची माफी मागायलाच हवी. तिला मिठीत घेऊन सुखाचे क्षण द्यायला हवेत.

तो दरवाजा उघडून रूममध्ये गेला ती डोळे मिटून शांत होती. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि हळूच म्हणाला, “कुमुद, मला माफ कर. मला सगळं समजलंय. आपण आनंदाने राहू. तू परत ये...” कुमुदच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. त्याची मिठी तशीच होती. तो भानावर आला. तिचं शरीर गार होत होतं. आज ती खऱ्या अर्थाने शांत झोपली होती.


- सोनिया परब