मेरशी येथील फ्लायओव्हरवरील अपघातात दुचाकीस्वार ठार
पणजी : मेरशी येथील फ्लायओव्हरवर चुकीच्या बाजूने दुचाकी चालवल्यामुळे कारला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालक गीमेल काजूर (३१, रा. ताळगाव, मूळ छत्तीसगड) याचा मृत्यू झाला. दुभाजक व्यवस्थित नसल्यामुळे घटनास्थळी वाहनचालक नेहमीच गोंधळतात. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. ६ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान मेरशी येथील फ्लायओव्हर जवळ रस्त्यावर स्विफ्ट कार (जी. ए. ०७ एन.०७१६) आणि स्प्लेंडर मोटारसायकल (जी. ए. ०७ डी. ६९४५) यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. याच दरम्यान नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला आणि पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तिथे पोहचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
या प्रकरणी जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान, दुचाकी चालक चिंबलहून मेरशीच्या दिशेने जात होता. तर स्विफ्ट कारचालक नवेश नाईक (आल्तिनो) पणजीहून जुने गोवाला जात होती. याच दरम्यान मेरशी येथील फ्लायओव्हर जवळ रस्त्यावर चुकीच्या बाजूने दुचाकी चालकाने आपली दिशा सोडून दुसऱ्या बाजूने दुचाकी घेतली. त्यात समोरून येणाऱ्या कारला दुचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. दरम्यान, वरील घटनास्थळी दुभाजक व्यवस्थित नसल्यामुळे वाहन चालक नेहमीच गोंधळतात. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.