रोहित-विराटला बसला जबर धक्का : जडेजासह सुंदरची गोलंदाजी क्रमावारीत प्रगती
दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारताच्या दारूण पराभवानंतर आयसीसीने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला थोडा फायदा झाला आहे. तर यशस्वी जैस्वालला धक्का बसला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही स्टार खेळाडूंना मात्र तगडा फटका बसला आहे.यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत काही विशेष करू शकला नाही, त्यामुळेच तो आता एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे, त्याचे रेटिंग आता ७७७ आहे. स्टीव्ह स्मिथ अजूनही ७५७ च्या रेटिंगसह ५व्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतने मुंबई कसोटीत इतर फलंदाजांच्या तुलनेत सरस कामगिरी केली होती, त्याचाच फायदा त्याला यावेळी क्रमवारीत होताना दिसत आहे. त्याने आता पाच स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७५० झाले आहे. या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज टॉप १० मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. विराट कोहली ८ स्थानानी खाली गेला आहे. त्याचे रेटिंग ६५५ पर्यंत घसरले असून तो २२व्या क्रमांकावर आहे. सततच्या खराब खेळाचा परिणाम या क्रमवारीत दिसून येत आहे. रोहित शर्मा तर तो थेट २६ व्या क्रमांकावर गेला आहे. त्याला दोन स्थानांचा फटका बसला आहे. त्याचे रेटिंग सध्या ६२९ आहे. याचाच अर्थ आता या दोघांनाही टॉप १० मध्ये परतणे खूप कठीण जाणार आहे.न्यूझीलंडविरूध्दच्या भारताच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकावल्याचा फायदा झाला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ९०३ आहे. तर केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ८०४ आहे. म्हणजेच पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यांच्यात फरक बराच मोठा आहे. यानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७७८ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत पाच स्थानांनी झेप घेत जगातील सहावा कसोटी फलंदाज ठरला आहे, तर गोलंदाजी क्रमवारीत फिरकीपटू रवींद्र जडेजाही गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावात पाच बळी घेत दोन स्थानांनी झेप घेतली आहे आणि जागतिक कसोटी गोलंदाजांमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे आता ८०२ रेटिंग गुण आहेत.
भारताचा सर्वोच्च क्रमांकाचा कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराह ८३८ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. रविचंद्रन अश्विनची एका स्थानानं घसरण झाली असून तो आता पाचव्या क्रमांकावर आहे. तर अन्य भारतीयामध्ये वॉशिंग्टन सुंदरने सात स्थानांची प्रगती करत कसोटी गोलंदाजांमध्ये ४६वे स्थान मिळवले आहे.
रबाडाचे अव्वल स्थान कायम
दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने गेल्याच आठवड्यात आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहला मागे टाकले होते आणि तो ८७२ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स यांच्या पुढे दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज एजाज पटेल (१२ स्थानांची प्रगती ) आणि ईश सोधी (तीन स्थानांची प्रगती) अनुक्रमे २२ व्या आणि ७० व्या स्थानावर आहेत.