आयओसीला पाठवले पत्र : यजमानपद मिळाल्यास देशी खेळावर देणार भर
नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजेच आयओएने २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आयओसीला पत्र पाठवले आहे.
क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारताला सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तान यांसारख्या अनेक देशांचा समावेश आहे, ज्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी स्वत: ला प्रबळ दावेदार मानले आहे.
दरम्यान, ही स्पर्धात भारतात व्हावी, अशी इच्छा आयओसीचे प्रमुख थॉमस बाक यांनी व्यक्त केली आहे. भारताने यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. ही स्पर्धा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. जर भारताला २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले तर, ही स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित केली जाईल, असे बोलले जात आहे.
आयओएचे अध्यक्ष पीटी उषा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. भारताला यजमानपद मिळाल्यास योग, खो-खो आणि कबड्डी यांसारख्या देशी खेळांचा समावेश करण्यावर भर दिला जाईल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मिशन ऑलिंपिक सेलने (एमओसी) नवीन क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांना ऑलिम्पिकमध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर केला आहे.
'हे' देशही यजमानपदाच्या शर्यतीत
भारताबरोबरच इजिप्त, इंग्लंड, इंडोनेशिया आणि कतार या देशांनी २०३६ च्या खेळांचे आयोजन करण्यास स्वारस्य दाखवले आहे. ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात स्पष्ट केले आहे की, यजमानपदासाठी १० संभाव्य देशांशी चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली यजमानपद कोणत्या देशाला देण्यात यावे, याचे अधिकार देण्याची प्रक्रिय गुप्त असते. दरम्यान, २०१६च्या गेम्ससाठी रिओ दी जानेरोने बोली जिंकली, तर २०२० गेम्सच्या यजमानपदासाठी टोकियोची निवड झाली होती.