यावेळी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी 'गोयंच्या सायबा'चे अवशेष विशेष बग्गीतून बॅसिलिका ते कॅथेड्रलपर्यंत आणि सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा कॅथेड्रलमधून बॅसिलिकामध्ये आणण्यात येणार आहे. दरम्यान ही विशेष बग्गी इलेक्ट्रिक असून ती चालवण्यासाठी चालक नेमण्यात आला आहे, अशी माहिती आर्कडायोसीसच्या प्रदर्शन समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्काओ यांनी दिली. या विशेष बग्गीवर कलाकुसर आणि इतर सजावट करण्याचे काम बेताळभाटी येथील चर्चचे पेरीश फादर ॲड्रियन फुर्तादो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सोहळ्या दिवशी सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शनात अनेक लोकांची मदत लाभणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून यासाठी अनेकांची निवड करण्यात आली आहे व पोलिसांना त्यांची माहिती देण्यात आली आहेत. या सोहळ्याला अनन्य साधारण महत्त्वप्राप्त असल्याने सर्व काही सुरळीत व्हावे यासाठी पोलीस सहकार्य करतील असेही फादर फाल्काओ म्हणाले.
या सोहळ्याचे महत्व लक्षात घेता सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष घेऊन प्रदर्शनात धार्मिक कार्ये पार पाडणाऱ्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. दरम्यान फादर फाल्काओ यांनी भाविकांनी अवशेषांच्या दर्शनावेळी गोंधळ करू नये असे म्हटले आहे कारण सेंट झेवियरांच्या अवशेषांना काही झाल्यास त्याची जबाबदारी चर्चची असेल. या व अशा अनेक कारणांसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, हवामानाची स्थिती पाहता प्रदर्शन सोहळ्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शव प्रदर्शन सोहळा तब्बल ४५ दिवस चालणार असून पावसाची शक्यता लक्षात घेऊनच त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. दरम्यान लोकांच्या सुविधेसाठी मांडव उभारण्यात येणार असून यात जर्मन हँगर उभारण्यात येणार आहे. एकूण तयारी आता अंतिम टप्प्यांत पोहोचली असून येत्या काही दिवसांत ती पूर्ण होईल व एकूणच सोहळा चांगल्यारीतीने पार पडेल असा आशावाद फाल्काओ यांनी यावेळी व्यक्त केला.