कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेत दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी एका महिला उमेदवाराशी पुरुष नेत्याची टक्कर होत आहे. २०१६ साली डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन अशी लढत रंगतदार ठरली होती. यावेळी एका माजी अध्यक्षांशी विद्यमान उपाध्यक्ष लढा देत आहेत.

Story: अग्रलेख |
04th November 2024, 12:25 am
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प?

ज्यावेळी कोणत्याही देशात निवडणुका होतात, त्या प्रत्येक वेळी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे म्हटले जाते. काही वेळा खरोखरच एखादी निवडणूक संबंधित देशाच्या एकंदरीत भवितव्याला कलाटणी देणारी ठरू शकते. केवळ त्याच देशावर नव्हे, तर निवडणुकांचे निकाल अन्य देशांवरही परिणाम करणारे ठरतात. उद्या (मंगळवारी) अमेरिकेत होणारी अध्यक्षपदाची निवडणूक जगाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेत दुसऱ्यांदा अशी निवडणूक होत आहे, ज्यात एका महिला उमेदवाराशी पुरुष नेत्याची टक्कर होत आहे. २०१६ साली डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन अशी लढत रंगतदार ठरली होती. यावेळी एका माजी अध्यक्षांशी विद्यमान उपाध्यक्ष लढा देत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. कॅलिफोर्निया प्रांताच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम सांभाळणाऱ्या विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस या पेशाने वकील आहेत. त्यांची आई भारतीय असली त्यांचे वडील जमेकाचे रहिवासी आहेत. सध्या अध्यक्ष असलेले ज्यो बायडन यांच्या कालावधीत त्या देशाची अर्थव्यवस्था स्थिर असून बेरोजगारीचा दर चार टक्के आहे. २४ जुलै २०२४ रोजी बायडन यांनी आपल्या आरोग्याचे कारण देत माघार घेताना, डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव घोषित केले होते. तेव्हापासून त्यांचे नाव सतत चर्चेत राहिले आहे. त्यांच्याविरोधात उभे राहिलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त व्यक्तिमत्व वडिलांच्या बांधकाम उद्योगाचा वारसा चालवत असून, त्यांनी कामगारच नव्हे तर वकिलांनाही ठकवल्याचे सांगितले जाते. अनेकवेळा त्यांनी दिवाळखोरी जाहीर करून आपली कशीबशी सुटका करून घेतली होती. मागच्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा ठपका त्यांच्यावर आहेच, शिवाय दोन वेळा महाभियोगाला ते सामोरे गेले होते, फौजदारी स्वरुपाचे खटले त्यांच्याविरुद्ध चालले. अमेरिकेची कचरा पेटी बनली असून, पुन्हा देशाला वैभव प्राप्त करून द्या असे आवाहन करताना, कमला हॅरिस यांना ते कमी बुद्धिमत्तेच्या महिला मानतात. त्या डाव्या विचारसरणीच्या, समाजवादी असल्याची टीका करताना त्यांचा उदारमतवाद आपल्याला मान्य नसल्याचे ते ठासून मतदारांना सांगत आले आहेत.

कमला हॅरिस यांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे अस्थिर आणि बेताल व्यक्तिमत्व असून, अमर्याद सत्तेसाठी हपापलेले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका इलेक्टोरल कॉलेजच्या मतांच्या आधारे ठरवल्या जातात आणि नेवाडा, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, अॅरिझोना, जॉर्जिया, विस्कॉन्सिन आणि पेन्सिल्व्हेनिया या महत्त्वाच्या राज्यांबद्दल सतत बोलले जाते आणि तेथेच उमेदवारांची समान विभागणी केली जाते आणि दोघांपैकी एकाला थोडाही फायदा झाला तर तो बहुधा अल्प फरकाने मात करतो. यावेळी नेमका कोणता उमेदवार निवडून येणार हे सांगणे कठीण बनले आहे. आपल्या देशाप्रमाणे तेथे जनमत कौल घेतले जात नसले तरी अंदाज वर्तविण्यात प्रसार माध्यमे मागे राहिलेली नाहीत. कल काय आहे, कोण आघाडीवर आहे, यावर भाष्य करताना वेगवेगळी वृत्तपत्रे विविध अंदाज व्यक्त करतात. ट्रम्प निवडले गेले तर त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांची मोठ्या प्रमाणावर हकालपट्टी होऊ शकते, कठोर कौटुंबिक विभक्तता होऊ शकते, उमेदवाराच्या मित्रपक्षांच्या उजव्या विचारसरणीच्या अजेंड्यांची पूर्तता करण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अधिक पुराणमतवादी न्यायाधीशांची भर पडू शकते. अमेरिकेच्या संविधानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ट्रम्प यांनी देशात होणारी ही शेवटची निवडणूक असू शकते, असेही म्हटले असल्याने त्यांचा नेमका काय इरादा आहे, ते स्पष्ट होत नाही. याच कारणास्तव कमला हॅरिस यांना जनता संधी देऊ शकते. ट्रम्प निवडून आल्यास ते विरोधकांना संपविण्यासाठी सैनाचाही वापर करतील अशी धास्ती व्यक्त केली जात आहे. याउलट कमला हॅरिस यांनी २५० वर्षांपूर्वी जन्मास आलेल्या अमेरिकेने स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान वाया जाणार नाही, देशात हुकूमशहा तयार होणार नाहीत, अशी टीका ट्र्म्प यांच्यावर केली आहे. हॅरिस यांचा विजय झाल्यास महिलांच्या गर्भपाताच्या हक्कांची पुनर्स्थापना होऊ शकते, रोजगार निर्मिती आणि सर्व अमेरिकनांच्या हितासाठी काम करू शकणारे न्याय्य सरकार मिळण्याची आशा बाळगणाऱ्या लाखो अमेरिकनांना आश्वासन मिळू शकते. अमेरिकेच्या जनतेला आणखी एक धास्ती सतावते आहे ती म्हणजे जर संख्याबळ हॅरिस यांच्या बाजूने गेले तर ट्रम्प निवडणूक निकाल स्वीकारतील याची शाश्वती नाही आणि जर ट्रम्प पराभूत झाले तर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा गोंधळ माजवण्याची दाट शक्यता आहे. निकाल काय लागतील हे समजण्यासाठी एकाच दिवसाची प्रतीक्षा बाकी राहिली आहे.