खोलीत आढळली सुसाइड नोट
फर्मागुडी : येथील आयआयटी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिव्या विजयकुमार खती (१९, मध्यप्रदेश) या विद्यार्थीनीने गर्ल्स हॉस्टेल मधील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.
फर्मागुडी येथील आयआयटीत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या जिव्या विजयकुमार खती या विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी संध्याकाळी गर्ल्स हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या जीव्याच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने इतर मुलींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी जीव्या गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिला त्वरित फोंडा येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले. पण तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणाची फोंडा पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता त्यांना सुसाइड नोट आढळून आली. तणावाखाली असल्याने तिने आत्महत्या केल्याचे यात लिहिले होते. दरम्यान तिच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते गोव्यात दाखल झाल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी तपास करीत आहे.