बांगलादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुहम्मद युनूसच्या सरकारने उलट तेथील हिंदू नेत्यांवरच गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. हे अत्याचार थांबवावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असे म्हणत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
ढाका : बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून येथील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार वाढले आहेत. आता या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांवर येथील मुहम्मद युनूसच्या सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने बांगलादेश सरकारने राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल करून १९ अल्पसंख्यांक हिंदू नेत्यांना घेरण्याचा कट रचला आहे. यामुळे बांगलादेशातील हिंदू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून यावेळी सरकारला यावर विचार करण्यासाठी ७२ चा अल्टिमेटम दिला आहे.
मोहम्मद युनूस सरकारने लादलेल्या खोट्या खटल्यांचा बांगलादेशातील हिंदू एकजुटीने निषेध करत आहेत. येथील चितगावमधील चेरनी बाजार चौकात हजारो हिंदूंनी एकत्र येऊन त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, अशी मागणी त्यांनी अंतरिम सरकारकडे केली आहे. मुस्लिम कट्टरतावादी संघटना ५ ऑगस्टपासून हिंदू मंदिरे आणि त्यांच्या कार्यक्रमांना लक्ष्य करत आहेत, परंतु युनूसचे सरकार हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे. उलट या सरकारने आता हिंदू धर्मगुरूंवर खटले सुरू केले आहेत.
बांगलादेशच्या युनूस सरकारने आतापर्यंत १९ हिंदू नेत्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यापैकी २ जणांना अटकही करण्यात आली आहे. ज्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांचाही समावेश आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ते आवाज उठवत आहेत. या सर्वांवर २५ ऑक्टोबर रोजी चितगाव येथे झालेल्या निदर्शनादरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करत वर भगवा ध्वज फडकवल्याचा आरोप आहे. बांगलादेश सनातन जागरण मंचचे नेते चिन्मय कृष्णा दास ५ ऑगस्ट रोजी सत्ता पालटल्यापासून हिंदूंवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आघाडीवर आहेत.
२५ ऑक्टोबर रोजी चितगावमध्ये हिंदूंची एक मोठी बैठक झाली होती, यामध्ये चिन्मय कृष्णा दास यांनी कट्टरवाद्यांना थेट आव्हान दिले होते. 'आपले आंदोलन कोणत्याही देश, सरकार किंवा पक्षाविरुद्ध नाही, फक्त बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करावे इतकीच आपली मागणी असल्याचे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चिन्मय कृष्णा दास म्हणाले होते. चिन्मय कृष्णा दास हे इस्कॉन संस्थेशी संबंधित आहे, त्यामुळे भारतातील इस्कॉनशी संबंधित लोकांनी चिंता व्यक्त केली आहे, असे इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. आता बांगलादेश सरकार ७२ तासांत काही पावले उचलते की येथील अल्पसंख्यांक हिंदू आंदोलन अधिक तीव्र करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.