कळंगुट : समुद्र किनाऱ्यांची राणी बदनामीच्या वाटेवर

आपला गोवा एखादे कीव आणणारे डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि सध्या कळंगुट-कांदोळी समुद्रकिनार्‍यावर घडणार्‍या घटना याची साक्ष देत आहेत.

Story: कॉलिंग अटेंशन |
03rd November, 12:30 am
कळंगुट :  समुद्र किनाऱ्यांची राणी बदनामीच्या वाटेवर

हल्लीचीच गोष्ट, मी मित्रांसोबत बँकॉकला जाण्यासाठीची परवानगी आईकडे मागितली. आई रागावली आणि गेलास तर तंगड्याच मोडून ठेवते म्हणून तिने मला सक्त ताकीद दिली! मी जर बँकॉकऐवजी युरोपला जातो असे आईला सांगितले असते, तर तिने मला लगेचच परवानगी दिली असती. सांगायचा मतितार्थ हाच की, सध्या आपला गोवा असेच कीव आणणारे डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाले आहे. सध्या कळंगुट-कांदोळी समुद्रकिनार्‍यावर घडणार्‍या घटना याची साक्ष देत आहेत.

 गोव्याचे नाव बदनाम करणार्‍या घटना कळंगुट परिसरात घडतात ही काही नवीन गोष्ट नसली, तरी काही काळासाठी अश्या घटना बंद होत्या. पण हल्लीच पर्यटन हंगाम सुरू झाल्यावर या घटनांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. कांदोळीत जनावरांच्या डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना असो, पर्यटकांनी स्थानिक तरुणीची छेड काढण्याची घटना असो, टिटोस लेनवर क्लब कर्मचार्‍यांकडून तलवारी हातात घेऊन घेराव घालण्याचा प्रयत्न असो किंवा टॅक्सीवाल्यांकडून पर्यटक कुटुंबाला मारहाण करणे असो या घटनांमुळे पुन्हा गोवा चर्चेत आला आहे. पण सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचे वाटत आहे.

 आमच्या लहानपणापासून कळगुंट म्हणजे गोव्याची राणी. एक शांत, सुंदर असा समुद्र किनारा आणि रात्रीच्या सुंदर वातावरणासाठी प्रसिद्ध. पण आता ती त्याची ओळख पूर्ण बदलली आहे. आता कळंगुट हे मिनी वा देशी बँकॉकच बनले आहे. आता कळंगुट सगळ्या वाईटच गोष्टींसाठी, खासकरून ड्रग्ज      व्यवसायासाठी ओळखले जाते. बरेचसे पर्यटक हे सुंदर समुद्र किनारा पाहण्यासाठी नव्हे, तर या नको त्या गोष्टींसाठीच गोव्यात येतात.

ही ओळख काही इथली खरी ओळख नव्हे. बँकॉकला ज्या गोष्टी उघडपणे मिळतात, तशा इथे मिळत नाहीत. पर्यटकांचा याविषयी फार मोठा गैरसमज आहे. त्यामुळे इथे पर्यटक येतात आणि त्यांना आलेला वाईट अनुभव घेऊन ते जातात. त्यातून कळंगुटबरोबर पूर्ण गोव्याची बदनामी होते हे मात्र खरे. ज्यावेळी उत्तर भारतीयांची नजर कळंगुटवर पडली, तेव्हापासून या सुंदर समुद्रकिनाऱ्याची विटंबना सुरु झाली. गोवेकरांचा सुशेगादपणा पाहता स्वतः रेस्टोरेंट आणि दुकाने चालवायची सोडून ती उत्तर भारतीयांना भाड्याला देण्यात आली. उत्तर भारतीयांनी सांगितलेल्या बक्कळ पैश्यांना स्थानिक भुलले. स्थानिकांना वाटले की जेवढे पैसे मी पाच वर्षात कमवेन, त्याहून दुप्पट पैसा हे बाहेरचे लोक आपल्याला देतायत. त्यात वाईट काय आहे? बाकीचा कोणताही विचार न करता स्थानिकांनी आपली दुकानं भाड्याला दिली. 

एवढा पैसा उत्तर भारतीयांनी व्यवसायात गुंतवल्यावर अधिक पैसे कमवण्यासाठी त्यांनी पर्यटकांची फसवणूक करण्याचा व्यवसाय सुरू केला, तो म्हणजे रेस्टोरंटमध्ये डान्सबार क्लब सुरू करून पर्यटकांना वेश्या व्यवसायाचा हव्यास दाखवणे. कायद्यातून चोरवाटा शोधून पंचायतींना पैसे चारून हे डान्सबार सुरू करतात. होते काय तर आत वेश्या व्यवसाय चालत नाही, फक्त बायका नाचतात. पण सहजासहजी कुणीच पर्यटक यांच्या डान्सबारमध्ये येणार नाहीत म्हणून त्यांना दलालांचा आधार घ्यावा लागतो. हे दलाल परिसरात फिरून "लडकी चाहीये क्या?" असे विचारून पर्यटकांना तिकडे खेचतात. याच गोष्टींसाठी आलेले पर्यटक लगेचच याला बळी पडतात. हे दलाल त्यांना डान्सबारकडे नेतात, त्यांची तिकीट काढतात आणि त्यांना आत नेतात. त्यानंतर आपले कमिशन घेऊन पसार होतात. 

आत गेल्यावर त्या गिऱ्हाईकांना मुलींकडून कॉकटेल विकत घ्यायला सांगतात. कॉकटेल घेतल्यावरच त्या तुमच्यासोबत डान्स करतील असे सांगितले जाते. त्यामुळे ते कॉकटेल विकत घेतात आणि मुलींना घेवून ते नाचतात खरे, पण ज्या उद्देशाने ते तेथे आलेले आसतात ते न मिळाल्याने भांडण काढतात. त्यांना समजते की, ‘लडकी मिलेगा’ असे सांगून त्यांना मूर्खात काढले आहे. यावर गिऱ्हाईक जेव्हा पैसे परत मागतात, त्यावेळी त्याला मारहाण केली जाते. वरुन पोलिसांची धमकी देऊन गुगल पे वरून त्यांच्याकडचे पैसे काढून घेतले जातात. पोलिसांना वेळेवर हप्ता मिळत असल्यामुळे पोलीसही याकडे दुर्लक्ष करतात.

आधी कळंगुट प्रतिनिधी म्हणून काम करताना एक डान्सबार मालक मला भेटले. त्यांनी मला म्हटले, "हम पंचायत, एमएलए, पोलीस को हफ्ता पहुंचाते है| तुम्हारे एडिटर को बोलो कितना पहुचाना है पर हमारे खिलाप सब न्युज बंद होना चाहीए|" तो पुढे बोलू लागला, "हम लोग लडकी नचाते है, कायदे से नचाते है|" सर्व सेटिंग्स लावूनच त्यांनी हा धंदा सुरू केलेला आहे हे माझ्या लक्षात आले. पण जेव्हा या गोष्टींचा वाईट परिणाम पर्यटनावर होतो तेव्हा पंचायत, आमदार, पर्यटन मंत्री, पोलीस सर्व ब्लेम गेम खेळतात आणि यांचे इच्छित साधते. 

टिटोस लेनवर डान्सबाराच्या कर्मचाऱ्यांनी दंगे करून तलवारी, हॉकी स्टीक काढून स्थानिकांना मारहाण केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जाग आली. त्यांनी शस्त्रानिशी पोलिसांना कळंगुटमध्ये ठेवले. पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी कळंगुट शांत होते. पण हा फक्त दोन दिवसांचाच खेळ. शस्त्रानिशी असलेले पोलीस गेले आणि मुख्यमंत्र्याचा धाकही गेला. आता कळंगुटला जाऊन पहिले तर पूर्ण रस्त्यावर रहदारीचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि ते सोडवायला ट्राफिक पोलीससुद्धा नाहीत.


समीप नार्वेकर