तुम्हालाही वारंवार शिंका येतात का?

आपल्या दिवसाची सुरुवात कशी प्रसन्न व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं... पण नाही, सकाळी उठल्या उठल्या अंथरूणातून उतरताच धडाधड शिंका चालू. अगदी जीव अर्धा झाला, डोळ्यातनं पाणी व्हाहतंय तरीही शिंका मात्र थांबत नाहीत..

Story: आरोग्य |
26th October 2024, 03:10 am
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का?

अनेकांची अशी तक्रार असेल की, मधेच त्यांना शिंका येण्यास सुरुवात होते. एकापाठोपाठ एक शिंका येऊ लागतात आणि संपूर्ण मूड खराब होतो. काही वेळा शिंका येण्याव्यतिरिक्त नाक आणि घशात खाज येते. जर तुम्ही किंवा तुमची जवळची व्यक्ती या समस्येतून जात असाल तर तुम्हाला या एलर्जीविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आज आणून घेऊयात सलग शिंका येण्यामागचं नेमकं कारण काय असू शकते.

आपण एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात गेल्यास किंवा आपल्या वातावरणात अचानक काही बदल झाल्यास आजूबाजूची धूळ आणि हानिकारक कण नाकातून शरीरात प्रवेश करू शकतात. नाकाने धुळीचे कण थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अनेक धुळीचे कण एकाच वेळी शरीरात जातात आणि त्यांच्या प्रतिक्रियेमुळे घशात खाज सुटण्याबरोबरच शिंका येण्यास सुरुवात होते. तीव्र झाल्यास, नाक आणि घशात खाज सुटण्याबरोबरच चेहऱ्यावर सूज येऊ शकते. या प्रकारच्या ऍलर्जीला ‘ऍलर्जीक राईनाइटिस' म्हणतात.

फक्त धुळीमुळे ऍलर्जीक राईनाइटिस चालू होऊ शकते असे नाही.  कधीकधी तापमानात बदल झाल्यामुळे देखील हे होऊ शकते आणि व्यक्तीला शिंका येणे सुरू होते. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान कमी होते आणि जागे होताच तापमान वाढू लागते. या तापमानातील बदलामुळे नाकाची प्रणाली असंतुलित होते आणि शिंका येण्यास सुरुवात होते. 

वसंतऋतूमध्येही धुळीच्या कणांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे शिंका येण्याच्या प्रमाणात वाढ होते. यासोबत डोळे लाल होणे, खाज येणे, डो‍ळ्यांतून सतत पाणी येणे असा त्रास होतो. यामुळे ऍलर्जीक राईनाइटिस असलेल्यांसाठी वसंतऋतू त्रासदायक ठरू शकतो. 

ऍलर्जीक राईनाइटिस अत्यंत सामान्य ऍलर्जीचा प्रकार आहे. याचा परिणाम जगातील १० ते ३० % लोकसंख्येवर होतो. ऍलर्जीक राईनाइटिस असलेल्या लोकांना ऍलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थात जसे की बुरशीचे बीजाणू, धूळ, प्रदूषित कण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा परागकण श्वासातून आत घेतल्यानंतर काही मिनिटांत लक्षणे दिसू लागतात. शिंका येणे, नाकात खाज सुटणे, सतत वाहणारे नाक, ब्लॉक झालेले नाक, तोंड आणि घशाला खाज सुटणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे आणि पाणी येणे ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.

ऍलर्जीक राईनाइटिसवर पूर्ण उपचार नसला तरी आपल्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करण्याचे काही मार्ग आहेत. उपचारांच्या पर्यायांमध्ये अँटीहिस्टामाइन्स, कॉर्टिकोस्टिरॉईड्स, डिकंजेस्टंट्स, अनुनासिक सिंचन (नेसल ईरीगेशन) यासारख्या उपचारांचा समावेश होतो.

अँटीहिस्टामाइन्स : जेव्हा ऍलर्जीची प्रतिक्रिया होते तेव्हा आपल्या शरीरात सोडले जाणारे हे रसायन असते. अँटीहिस्टामाइन्स आयड्रॉप्स, नाकातील फवारण्या, तोंडी घ्यायच्या गोळ्या आणि सिरप स्वरूपात असतात.

इंट्रानासल कॉर्टिकोस्टिरॉईड्स: हे नाकाच्या आतील जळजळ कमी करू शकतात आणि अनुनासिक रक्तसंचय तसेच शिंका येणे, खाज सुटणे आणि वाहणारे नाक लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. 

अनुनासिक सिंचन (नाकापुड्यात खारट पाणी ओतण्याची प्रथा) प्रौढ आणि मुले दोघांनाही ऍलर्जीक राईनाइटिसची लक्षणे दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 

 डिकंजेस्टंट्स : तोंडावाटे किंवा नाकातील कंजेस्टंट सुजलेल्या नाकाच्या ऊतींना आकुंचित करण्यास आणि रक्तसंचय कमी करण्यास मदत करतात.

 ऍलर्जन इम्युनोथेरपी म्हणजेच डिसेन्सिटायझेशन यामध्ये लोकांना पदार्थांची सवय लावण्यासाठी ऍलर्जीनचे छोट्या छोट्या प्रमाणात डोस दिले जातात.

ऍलर्जीक राईनाइटिस असलेली व्यक्ती विशिष्ट ट्रिगर ओळखून आणि योग्य रणनीती वापरून, जसे की ऍलर्जी टाळणे, औषधोपचार आणि इम्युनोथेरपी प्रभावीपणे लक्षणे कमी करुन आपले जीवनमान सुधारू शकतात. अनुकूल पदधतींसह, ऍलर्जीक राईनाइटिसमुळे होणारी अस्वस्थता लक्षणीयरीत्या कमी केली जाऊ शकते.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर