विकासाचे दरवाजे उघडणारा ‘एक्सप्रेस वे’

बिहार

Story: राज्यरंग |
11 hours ago
विकासाचे दरवाजे उघडणारा ‘एक्सप्रेस वे’

बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यांना जोडणारा ‘गोरखपूर-सिलिगुडी एक्सप्रेस वे’ जलदगतीने तयार करण्यात येणार आहे. तिन्ही राज्यांसाठी हा एक्स्प्रेस वे आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडेल. या मार्गाच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. हा एक्स्प्रेस वे बिहारच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. बिहारच्या आठ जिल्ह्यांतून जाणाऱ्या या एक्स्प्रेस वेची एकूण लांबी ५१९ किलोमीटर असेल.

हा एक्स्प्रेस वे ८४.३ किलोमीटर उत्तर प्रदेशमधून, ४१६ किलोमीटर बिहारमधून आणि १८.९७ किलोमीटर पश्चिम बंगालमधून जाणार आहे. त्यातील सर्वात मोठा भाग बिहारमधून जाणार आहे. हा एक्सप्रेस वे थेट बिहारमधील दरभंगा, चंपारण, सीतामढी, मधुबनी, किशनगंज, सुपौल आणि फारबिसगंजला जोडेल. त्याच्या बांधणीने या जिल्ह्यांचा विकास होणार आहे. या क्षेत्रांच्या आर्थिक प्रगतीला यामुळे वेग येईल.

बिहारमधील आठ जिल्ह्यांतील ३०५ गावे या एक्स्प्रेस वेच्या मार्गात येतील. द्रुतगती मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात भूसंपादनाचे कामही सुरू होणार आहे. डीपीआरनुसार, बिहारमध्ये २,७५५ हेक्टर खासगी आणि १६८ हेक्टर सरकारी जमिनीवर एक्सप्रेस वे बांधला जाणार आहे. यासाठी एकूण २,९३३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

सध्या गोरखपूर ते सिलीगुडी या प्रवासाला १५ तास लागतात. हा द्रुतगती मार्ग बांधल्यानंतर नऊ तासांचा वेळ लागणार आहे. प्रवासी, व्यापारी आणि यूपीहून बिहार आणि बंगालला जाणाऱ्या पर्यटकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त बंगाललाही पर्यटन वाढीसाठी याचा फायदा होणार आहे. बहुतांश रस्ते बिहारमधून जातील, त्यामुळे बिहारला अधिक फायदा होईल.

गंडक नदीवर १० किलोमीटर लांबीचा मोठा पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल. या योजनेसाठी ३२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरखपूर, कुशीनगर आणि देवरिया येथील १११ गावांची जमीन संपादित करून हा एक्स्प्रेस वे विकसित केला जात आहे.

गोरखपूर-सिलिगुडी एक्स्प्रेस वेमुळे प्रवाशांशिवाय अनेक शहरांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागणार आहे. विशेषतः बिहारमधील दरभंगा आणि चंपारण भागातील परिस्थिती बदलेल. याशिवाय सुपौल आणि फारबिसगंजलाही याचा मोठा फायदा होणार आहे. तिन्ही राज्यांतील प्रवाशांना आरामात प्रवास करता येणार आहे. यासोबतच हा एक्स्प्रेस वे बिहारच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे केवळ गोरखपूर आणि सिलीगुडीमधील अंतर कमी होणार नाही तर अनेक शहरांची आर्थिक प्रगतीही होईल.

प्रसन्ना कोचरेकर