नियोजितपणा व कालाधीनता

शुध्द काळी देह ठेवणारे योगी लोक नि:संदेहपणे ब्रह्मरूप होतात. तसा जर तो शुध्द काळी ठेवता आला नाही आणि त्याऐवजी जर अकाली म्हणजे नकळत, नियोजनाशिवाय, अयोग्य काळी मृत्यू आला तर त्या जीवाला परत जन्म घ्यावा लागतो.

Story: विचारचक्र |
20th October, 10:59 pm
नियोजितपणा व कालाधीनता

मागील लेखात श्रीमद्भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायातील श्लोक २१ व २२ चा सरळ अर्थ आपण बघितला. आता त्यांच्या विस्तृत विवेचनाकडे वळूया.

हे अर्जुना, मन व बुध्दी यांना समजण्यासारख्या अशा वस्तूची वा गोष्टीची आपण जर स्तुती केली वा द्वेष केला वा निंदा केली तर ते समजू शकतो. कारण त्या वस्तूचे बरेवाईटपण आपल्याला कळलेले असते. अहो पण, जी वस्तू मन-बुध्दीला अगोचर आहे, म्हणजे अजिबात कळण्यासारखी नाही, तिला 'अव्यक्त'च म्हणावे लागते आणि तसे अव्यक्त म्हटले म्हणून काही ती स्तुती होत नाही!

साकार होऊन नटली तरी ज्या वस्तूचे निराकारपण मोडत नाही, आणि तो आकार लोप पावला तरी ज्या वस्तूचे नित्यपण बिघडत नाही; आणि असे असल्यामुळे अर्जुना, ज्या वस्तूला यथार्थपणे "अक्षर" असे संबोधतात. ज्याच्या पलिकडे आणखी कशाचाही विस्तार नसल्याने ज्याला चैतन्य अथवा परम-गती असं समजतात; ते जीवाची सगळी देह-नगरी व्यापून देखील निद्रिस्तासारखे असते. इंद्रियांकरवी देहाचे सगळे व्यापार करवून घेते आणि ते व्यापार झाले, नाही झाले, तरी त्याबाबतीत उदासीन असते.

हे धनुर्धरा, एरवी प्रत्यक्षात या जिवंत देहाचा व्यापार कधी कुणी थांबलेला बघितलाय का? सगळी दहाही इंद्रिये सदैव राजरोसपणे आपापल्या व्यवहारात मग्न असतात! मनोरूप राजरस्त्यावर त्यांनी त्या विषयांचा बाजार मांडलेला असतो. त्या बाजाराची परिणती म्हणून जी काही असते ती दोनच प्रकारांची असते. एक सुख व दुसरे दु:ख! त्या बाजाराच्या योगे ती परिणती ही जीवाला भोगायला मिळते. किंबहुना ती भोगावी लागते!

नृपाळ सुखशय्येवर झोपला म्हणून काय कधी राज्य-व्यवहार थांबतो का? त्याची ती प्रजा आपापल्या इच्छेनुसार व्यवहार करीत असते! सूर्य जरी अलिप्त असला (म्हणजे जरी त्याला कुणाच्या सुखदुःखाचे काही पडलेले नसले) तरी त्याच्या प्रकाशात सगळे लोक जगतात ना? त्याचप्रमाणे जे तत्व जीवाची सगळी देह-नगरी व्यापून असते  ते (प्रत्यक्ष दृष्टीस न पडल्याने) जरी निद्रिस्त वाटले, तरी त्याच्या असण्यामुळे इंद्रियांचे सगळे व्यापार, वायूची हालचाल, संकल्प-विकल्पांची देवाण-घेवाण, विनिमय, बुध्दीकडून होणारे आकलन, इत्यादि तमाम देह-क्रिया कुणी करवून न घेताही आपल्या आपण होत असतात! या देहामधे जो वास्तव्याला आल्यामुळे या सर्व क्रिया घडतात त्याला 'ईश्वर' वा 'पुरुष' ही संज्ञा प्राप्त आहे. 'प्रकृती' ही त्या पुरुषाची एकमेव पत्नी! म्हणून त्याला 'एकपत्नीव्रती' म्हणतात. अतिसूक्ष्म असे हे जे गगन आहे, ते त्या पुरुषाचे पांघरूण आहे. अर्जुना, जे चार वेदांमधले व त्यांच्या विस्तारामधले ज्ञान ज्याचे अंगण सुध्दा बघू शकत नाही, म्हणून उच्च प्रतीचे योगी त्याला 'परात्पर' म्हणतात. असा तो परात्पर जरी कितीही अनाकलनीय असला, तरी तो जे काया-वाचा-मने त्याची एकनिष्ठेने सेवा करतात, अनन्यभावे भक्ती करतात, त्यांना शोधत येतो! (तो मीच आहे हे तू जाण). त्या आस्तिक उपासक भक्तांचे हे पुरुषोत्तमरूप त्रैलोक्य सुपीक सुक्षेत्र विश्रातीचे स्थान आहे असा त्यांचा निश्चयी मनोभाव असतो. अहंतेचा पूर्ण अभाव हे त्यांचे श्रेष्ठत्व असते. त्यांचे ज्ञान त्रिगुणांना ओलांडून गेलेले असते. ते निष्कामी असतात. संतुष्ट असतात. संसाराची सगळी चिंता सोडून पूर्णतः मला शरण आलेले असतात! ते करत असलेली ती माझी भक्ती त्यांना परम सुखाचे साम्राज्य बहाल करते. त्यांची महती तुला आणखी किती विस्तारून सांगू? पण अर्जुना, ज्याच्याकडे जावे त्याच्यासारखेच व्हावे असेही काही असते ते तुला सांगतो ते ऐक.

थंडीची झुळूक लागताच ऊन पाणी थंड होते. काळोख सूर्यासमोर गेला तर त्याचा उजेडच होतो. अग्निमध्ये इंधन घातले की ते अग्निरूप होते. मग त्यातून लाकूड शोधले तरी सापडत नाही. ऊस एकदा साखरेत रूपांतरित झाला की मग त्या साखरेतून परत ऊस काढता येत नाही. दुधापासून तूप तयार केले की त्या तुपातून दूध परत मिळवता येत नाही. त्याच प्रमाणे जिथे गेल्यानंतर हे सगळे जीवन मोक्षमय होते आणि ज्या स्थानी पोचल्यानंतर जीवाला परत जन्माला यावे लागत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ परम निजधाम आहे हे रहस्य तू लक्षात ठेव.

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन:।

प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ।।२३।।

सरळ अर्थ : हे अर्जुना, ज्या कालात शरीर त्याग करून गेलेले योगी लोक परत न येणाऱ्या गतीला व परत येणाऱ्या गतीला ही पावतात तो काल म्हणजे मार्ग मी सांगतो.

विस्तृत विवेचन : खरे तर अर्जुना, एका परीने हे समजायला सोपे आहे. योगी लोक स्वतःचा देह ठेवून ज्याच्यामध्ये मिसळून जायला निघतात ते माझेच परमधाम आहे हे तू निश्चितपणे जाण, ही मी तुला माझ्या अंतरीची खूण सांगतोय. शुध्द काळी देह ठेवणारे योगी लोक नि:संदेहपणे ब्रह्मरूप होतात. तसा जर तो शुध्द काळी ठेवता आला नाही आणि त्याऐवजी जर अकाली (म्हणजे नकळत, नियोजनाशिवाय, अयोग्य काळी) मृत्यू आला तर त्या जीवाला परत जन्म घ्यावा लागतो. नियोजनपूर्कता नसेल तर शेवटी पुनर्जन्म आणि सायुज्यता या गोष्टी कालाधीन असतात. म्हणजे काळ जास्त महत्वाचा आहे. त्याच्या योग्यायोग्यतेची माहिती आता सांगतो ती ऐक.

अंतकाळी जीवाला आधी हळूहळू मृत्यूची गुंगी यायला लागते. त्यामुळे देहाला विकलता म्हणजे व्याकुळता प्राप्त होते. त्यावेळी हे अर्जुना, पंचमहाभूते आपापल्या वाटेने माघारी परतायला लागतात. (मूळ ब्रह्म. माया  - ब्रह्माचा आविष्कार. ब्रह्म व माया मिळून जीवाची उत्पत्ती होते. पंचमहाभूते  - मायेचा आविष्कार. पंचमहाभूतांच्या ठराविक मिश्रणाच्या सूक्ष्म अवस्थेत, म्हणजे देहाच्या अगदी सुरवातीच्या सूक्ष्मावस्थेत, ठराविक काळी जीवाचा प्रवेश होतो व परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार त्या जीव प्रवेशलेल्या सूक्ष्म देहाचा विस्तार होऊ लागतो. तो देह व त्याची सगळी इंद्रिये पंचमहाभूतांची बनलेली असतात. त्या देहाच्या मृत्यूचा, म्हणजे देहनाशाचा काळ समीप आला की ती पंचमहाभूतं आपापल्या मूळ ठिकाणी जायला तत्पर होतात. (क्रमशः)