उत्तर कोरियाच्या संविधानात घटनात्मक बदल

Story: विश्वरंग |
18th October, 11:56 pm
उत्तर कोरियाच्या संविधानात घटनात्मक बदल

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन जेव्हा-जेव्हा कोणताही निर्णय घेतो तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा त्याच्यावर केंद्रित असतात. त्यांच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिकेतही दहशत पसरली आहे. उत्तर कोरियाने प्रथमच असे पाऊल उचलल्यामुळे त्यांचा शेजारी देश दक्षिण कोरियाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात कोरियन द्वीपकल्पातील परिस्थिती झपाट्याने बदलू शकते. उत्तर कोरियाने आपल्या घटनेत दुरुस्ती करून दक्षिण कोरियाला शत्रू देश म्हणून घोषित केले आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी जानेवारीत दक्षिण कोरियाला देशाचा प्रमुख शत्रू घोषित करण्याचे आवाहन केले होते. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणावाची जगालाही कल्पना आहे.

उत्तर कोरियाकडून एक मोठे पाऊल उचलण्यात आले असून उत्तर कोरियाने नुकत्याच सुधारित केलेल्या संविधानात प्रथमच दक्षिण कोरियाचा शत्रू राष्ट्र असा उल्लेख केला आहे. तर उत्तर कोरियानेही याला दुजोरा दिला आहे. देशाच्या घटनेत बदल करण्यासाठी उत्तर कोरियाच्या संसदेची गेल्या आठवड्यात दोन दिवस बैठक झाली. परंतु, राज्य माध्यमांनी या सत्राविषयी अधिक तपशील त्वरित प्रदान केला नाही.

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी यावर्षी जानेवारीमध्ये केलेल्या भाषणात दक्षिण कोरियाला देशाचा मुख्य शत्रू घोषित करण्यासाठी संविधानात घटनात्मक बदल करण्याची मागणी केली होती. किम जोंग उन म्हणाले होते की, जर दक्षिण कोरियाने आमच्या जमीन, हवा आणि पाण्याच्या ०.००१ मिमी क्षेत्रावरही अतिक्रमण केले तर युद्ध होईल. त्यांनी शांततापूर्ण कोरियन एकीकरणाचे ध्येय संपवले आणि उत्तर कोरियाचे सार्वभौमत्व आणि प्रदेश परिभाषित केले. त्यामुळे किम जोंग उन यांच्या आवाहनाचा परिणाम आता दिसू लागला आहे.

उत्तर कोरियाने अलीकडे आता वापरात नसलेले रस्ते आणि रेल्वे दुवे तोडून टाकले आहेत आणि जे एकेकाळी उत्तर कोरियाला दक्षिण कोरियाशी जोडले होते. त्यांच्या विद्ध्वंसाबद्दल अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, संविधान स्पष्टपणे दक्षिण कोरियाला शत्रू राष्ट्र म्हणून परिभाषित करते. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने घटनात्मक बदलाबाबत अधिक तपशील दिलेला नाही. उत्तर कोरियाने दावा केला आहे की ते आपल्या सैन्यासाठी १४ लाख नवीन सैनिकांची भरती करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या देशातील तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले आहे. उत्तर कोरियामध्ये १२.८ लाख सक्रिय सैनिक आहेत, तर ६ लाख राखीव आहेत. याशिवाय ५७ लाख कामगार आणि शेतकरी रक्षकही आहेत.


- सुदेश दळवी