फोंडा : बोरी पूलाखाली रस्त्यानजीक असलेला 'तो' खड्डा ठरतोय वाहतुकीस धोकादायक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
फोंडा : बोरी पूलाखाली रस्त्यानजीक असलेला 'तो' खड्डा ठरतोय वाहतुकीस धोकादायक

फोंडा :   बोरी येथील पुलाखाली असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेला खड्डा येथून वाहतूक करणाऱ्यांसाठी ताप ठरत आहे. खड्डा भूमिगत गॅस वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आला होता. मात्र सदर काम गेल्या १५-२० दिवसांपासून बंदच आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्याशेजारी हा खड्डा खणल्याने सकाळी, दुपारी तसेच संध्याकाळी येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. एखादी दुर्घटना होण्याआधीच येथे उपाय योजना कराव्यात असे येथून वाहतूक करणारे प्रवासी आता म्हणत आहेत.  

दरम्यान भूमिगत  गॅस वाहिन्यांसाठी १५-२० दिवसापूर्वी खोदलेला या  खड्ड्यामुळे बोरी येथून शिरोडा मार्गे जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.  कंत्राटदाराने खड्ड्याच्या बाजूला लावलेले फलक भर दिवसा सुद्धा वाहन चालकांना स्पष्ट दिसून येत नाही. रात्रीच्या वेळी तर येथून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसते. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता  वाढली आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने सकाळी व संध्याकाळी परिसरात फोंडा वाहतूक पोलीस तैनात करण्यात येत आहे. तरी सुद्धा सुसाट वाहने येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

 खड्डा खोदलेल्या ठिकाणीच सावर्डे व शिरोडा येथे जाणाऱ्या बसेस प्रवाशांसाठी थांबतात. कंत्राटदाराने त्वरित काम पूर्ण करून खड्डा बुजवण्याची  मागणी वाहनचालक तसेच स्थानिक लोक करीत आहे.  


हेही वाचा