गोव्यात फुटबॉलाचा दर्जा सुधारण्यासाठी परिषद

क्रीडामंत्री गोविंद गावडे : मडगावात ९ ते १० ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसीय परिषद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th October, 12:02 am
गोव्यात फुटबॉलाचा दर्जा सुधारण्यासाठी परिषद

गोवा फुटबॉल समितीच्या लोगोचे लोकार्पण करताना मंत्री गोविंद गावडे. सोबत दिगंबर कामत, गीता नागवेकर व इतर. (समीप नार्वेकर)

पणजी : गोव्यातील फुटबॉलचा दर्जा नष्ट होत आहे. हा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने गोवा फुटबॉल विकास महामंडळ आणि गोवा फुटबॉल असोसिएशन गोवा फुटबॉल परिषद स्थापन करणार आहे. या परिषदेला नामवंत फुटबॉलपटू आणि क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. त्यांनी दिलेल्या शिफारशींची सरकार लवकरच अंमलबजावणी करेल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
गोवा फुटबॉल परिषदेची माहिती देण्यासाठी सोमवारी कला अकादमीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मंत्री गावडे यांच्यासमवेत परिषदेचे अध्यक्ष तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, क्रीडा संचालक गीता नागवेकर, जीएफचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस, पद्मश्री ब्रह्मानंद शांखवाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या लोगोचे अनावरण मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
२०१२ नंतर फुटबॉल हा राज्याचा खेळ म्हणून घोषित झाल्यानंतर आज या खेळाची अवस्था दयनीय आणि चिंताजनक झाली आहे. २००४-२००५ पासून गोवा संतोष ट्रॉफीच्या विजयाला ‍मुकला आहे. त्यामुळे फुटबॉल खेळाचा विकास व्हावा यासाठी परिषदेत चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.
बीपीएस स्पोर्ट्स क्लब, मडगाव येथे दि. ९ ते १० ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसीय परिषद होणार आहे. परिषदेचे उद्घाटन मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते होणार असून यावेळी पॅनेल चर्चा घेण्यात येईल. गावडे म्हणाले की, फुटबॉल भागधारकांना येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि समर्पित राज्य क्रीडा फुटबॉलचा दर्जा पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक शिफारशी करणे हा मुख्य उद्देश असेल.
या दोन दिवसीय परिषदेत पहिल्या दिवशी कोचिंग, व्यावसायिक क्लब, हौशी क्लब, खेळाडूंचा दृष्टिकोन, ग्रामीण फुटबॉल स्पर्धा, तळागाळातील युवा फुटबॉल आणि अकादमी, सुविधा, मार्केटिंग प्रायोजकत्व आणि चाहत्यांच्या सहभागावर तासभर चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी, पॅनेलचे सदस्य उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नवीन सादरीकरण करतील आणि गोवा फुटबॉलसाठी काय चांगले आहे यावर जीएफडीसी आणि जीएफएला ठोस उपाय सुचवण्यात येतील, असेही मंत्री गावडे म्हणाले.
परिषदेचे अध्यक्ष दिगंबर कामत म्हणाले, गोव्यात मुलाचा जन्म झाल्यानंतर काही काळानंतर तो प्रथम फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे राज्यात फुटबॉलचा दर्जा सुधारण्यासाठी अशा प्रकारची परिषद आयोजित केली जाते ही चांगली गोष्ट आहे.
जीएफडीसी आणि जीएफए सोबत पहिल्यांदाच एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आला. गेल्या १० वर्षांत दोन्ही संस्थांमध्ये थोडीफार दरी निर्माण झाली आहे. पण, आता जीएफडीसी तळागाळातील खेळाडूंना प्रशिक्षण देईल आणि आम्ही त्यांना पुढील स्तरावर नेऊ. या क्षेत्रातील उणिवांवर चर्चा करून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहोत, असे जीएफएचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सांगितले.

२०१२ मध्ये जीएफडीसीची स्थापना झाली. परंतु, गोव्यात फुटबॉलचा अधिक विकास झालेला नाही. फुटबॉलमध्ये पाय रोवलेली इतर राज्ये आता फुटबॉलमध्ये खूप पुढे गेली आहेत. मंत्री गावडे हे परिषदेचे मुख्य संरक्षक असल्याने सरकार लवकरात लवकर शिफारशी लागू करेल, अशी आशा आहे. _दिगंबर कामत, अध्यक्ष, गोवा फुटबॉल परिषद