अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट्स यांचा निवाडा
पणजी : सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सोमवारी या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट्स यांनी हा निवाडा दिला. वेलिंगकर यांनी पोलिसांसमक्ष हजर राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
वेलिंगकर यांच्या वक्तव्यामुळे गोव्यातील ख्रिस्ती बांधवांत नाराजी पसरली होती. गेल्या दोन दिवसांत वेलिंगकरांना अटक व्हावी, यासाठी गोव्यातील अनेक पोलीस स्थानकांत निवेदनेही देण्यात आली. दरम्यान, वेलिंगकरांना पोलिसांनी दोन वेळा नोटीस बजावूनदेखील ते हजर झाले नव्हते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. डिचोली पोलिसांतर्फे सरकारी वकील दर्शन गावस यांनी वेलिंगकर यांना जामीन नाकारण्यात यावा, असा युक्तिवाद केला होता.
सोमवारी सकाळी वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावेळी वेलिंगकरांच्या वकिलाने 'वेलिंगकर तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. लोकांच्या दबावाखाली त्यांना पोलीस अटक करतील. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे असे म्हटले. त्यांनी गुन्हा केलेला नाही, तर डीएनए टेस्ट करावी ही त्यांची केवळ मागणी असल्याचे ते म्हणाले. प्रतिवादी पक्षाच्या वकिलांनी 'वेलिंगकर हे वादग्रस्त वक्तव्य करून गोव्याचा सलोखा बिघडवण्याचे काम करतात.' असा युक्तिवाद केला.