दिल्ली : पूर्वी राजे-महाराजे आपल्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेशांतर करून त्यांच्यात मिसळत. यातून त्यांना आपल्या शासनात काय कमी आहे, काय सुधारणा करणे जरूरी आहे यांची माहती मिळत असे. अशा राज्यकर्त्यांप्रती जनतेमध्येही चांगले मत होते. आता राजा महाराजा राहिले नाहीत. पण त्यांची हीच धोरणे आजही काहीजण वापरतात. झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल हे त्यांपैकीच एक आहेत.
झोमॅटो ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. हजारो सर्वसामान्य लोक फूल टाइम-पार्ट टाइम डिलिव्हरी बॉयची नोकरी करून आपल्या गरजा भागवतात. बऱ्याचदा या डिलिव्हरी बॉयजना योग्य वागणूक दिली जात नाही. अशा अनेक प्रकरणांनी प्रेरित होऊन डिलिव्हरी बॉयजना योग्य सन्मान मिळावा व त्यांना फायदेशीर अशी धोरणे निर्माण करता यावी यासाठी या कंपनीचे सीईओ दीपेंद्र गोयल स्वतः आठवड्यातून डिलिव्हरी बॉय बनून काम करतात हे विशेष. त्यांना आलेले अनुभव ते नेहमी आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून शेअर करतात.
आता नवीनच शेअर केलेल्या व्हिडिओनुसार गोयल त्यांची दिवसातील दुसरी डिलिव्हरी ऑर्डर घेण्यासाठी एका मॉलमध्ये असलेल्या फूड आउटलेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यावेळी येथील सुरक्षा रक्षक त्यांना अडवत दुसऱ्या एंट्री पॉइंटमधून जाण्यास सांगतात. दरम्यान गोयल पुन्हा मुख्य दरवाजातून जाण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना डिलिव्हरी तयार होईपर्यंत पायऱ्यांवर थांबण्यास सांगतात.
दरम्यान सुरक्षा रक्षकांशी हुज्जत न घालता ते पायऱ्या चढून जातात. तेथेच त्यांना झोमॅटोचे काही डिलिव्हरी बॉय आपल्या ऑर्डरची वाट पाहतांना दिसून येतात. यावेळी गोयल देखील आपल्या ऑर्डरची वाट पाहत तेथेच बसतात. इतर डिलिव्हरी करणाऱ्यांशी संवाद साधतात. त्याच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन देतात. एकूणच व्हिडिओ भावनिक दृष्ट्या तुमच्या काळजाला भिडतो.
दरम्यान, आपल्या सर्व ऑर्डर पोहचवून झाल्यानंतर गोयल यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. 'डिलिव्हरी पार्टनर्सना आस्थापनांनी योग्य ती वागणूक द्यावी, त्यांनाही सन्मानाने वागवावे असे ते म्हणाले. तुमचे जेवण तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहचावे यासाठी ते खूप मेहनत घेतात. जास्त काही नाही पण आमच्याकडे निदान मानवतेच्या नजरेने पहा' असे ते म्हणाले. या व्हिडिओचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः कंपनीचे सीईओ डिलिव्हरी करण्याचे काम करतात हे स्तुत्य आहे असे सोशल मीडिया वापरकर्ते म्हणताहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ४० लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. दरम्यान दिवाळीचा हंगाम येत असून डिलिव्हरी पार्टनर्सच्या बेसिक इनसेंटीव्हमध्ये चांगली वाढ केली जाऊ शकते असे संकेत मिळाले आहेत.