नवी दिल्ली : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय भारत दौरा आहे. यापूर्वी त्यांनी या वर्षी जुलै महिन्यात भारताचा दौरा केला होता. आता ते चार महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात आले आहेत. अशा परिस्थितीत 'इंडिया आऊट'चा नारा देणारे 'मुजोर मुइझ्झू' पुन्हा पुन्हा भारतात का येत आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्याआधी मालदीवची सद्यस्थिती समजून घेण्याची गरज आहे. मालदीवचा परकीय चलनाचा साठा फक्त ४०० दशलक्ष डॉलर्स इतकाच शिल्लक आहे. यातून जास्तीत जास्त केवळ दीड महिन्यांचा खर्च भागवता येईल. पर्यटन हा मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे म्हटले जाते. पण मुइज्जूच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला. 'इंडिया आऊट' मोहिमेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. चीनकडून मालदीवने कुप तगड्या व्याजदरावर कर्ज घेतले होते. सुरवातीला याचे हप्ते पर्यटन क्षेत्रातील मिळकतीवर सुटत होते मात्र 'इंडिया आऊट' मोहिमेमुळे मालदीवने सेल्फ गोल केला. थकीत हप्ते भरू न शकल्यामुळे मालदीवच्या हातून तीन महत्त्वाची आयलँड निसटले. अशा परिस्थितीत आधीच कर्जाच्या समस्येला तोंड देत असलेल्या मालदीववरील दबाव आणखी वाढला आहे.
भारताशी पंगा घेणे मालदीवच्या चीन धार्जिण्या मुइझ्झू सरकारला चांगलेच बधल्याचे गेल्या काही महिन्यांत दिसून आले. हेच कारण आहे की मालदीवने भारताशी संबंध सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून मुइझ्झू पुन्हा पुन्हा भारत दौऱ्यावर येत आहेत. 'मालदीव आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि मला विश्वास आहे की भारत आम्हाला यामध्ये मदत करेल. भारताकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत.' असे भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी मुइझ्झू म्हटले होते. मालदीव सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर मुइज्जूच्या भारत भेटीचे एक विशेष पेज तयार करण्यात आले आहे, यामध्ये त्यांच्या भेटीची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. दरम्यान चीनसोबतच्या मालदीवच्या संबंधांमुळे भारताच्या सुरक्षेला कधीही धोका निर्माण होणार नाही असे मुइझ्झू यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुइज्जूचे भारतात आगमन झाल्यावर स्वागत केले, मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांना शुभेच्छा दिल्या.
मालदीवला १९६५ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. मालदीवला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या देशांमध्ये भारताचा प्रामुख्याने समावेश होता. मालदीवचे पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे हे सर्वज्ञात आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पर्यटनासाठी जातात.
* संरक्षण क्षेत्र
याशिवाय भारत १९८८ पासून संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात मालदीवला मदत करत आहे. एप्रिल २०१६ मध्ये या संदर्भातील करारावरही स्वाक्षरी करण्यात आली होती, यामुळे त्याला आणखी चालना मिळाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मालदीवियन नॅशनल डिफेन्स फोर्स (MNDF) च्या संरक्षण प्रशिक्षण गरजांसाठी भारत ७० टक्के सामग्री पुरवतो. गेल्या दशकात भारताने MNDF च्या १५०० हून अधिक सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे.
* पायाभूत सुविधांचा विकास
मालदीवच्या पायाभूत सुविधांच्या विकासात भारताचा मोठा वाटा आहे. मालदीवमधील अनेक मोठे विमानतळ तयार करण्यात भारताची भूमिका आहे. मालदीवचा ग्रेटर मेल कनेक्टिव्हिटी प्रकल्प हे याचे सर्वात मोठे उदाहरण . या प्रकल्पांतर्गत, ६.७४ किमी लांबीचा पूल मालदीवची राजधानी माले, विलिंगाली, गुलिफाल्हू आणि तिलाफुन्शी या बेटांशी जोडलेला आहे. भारताने या प्रकल्पासाठी ५०० दशलक्ष डॉलर्सची रक्कमही दिली आहे.
* आरोग्यसेवा आणि शिक्षण
मालदीवमधील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या विकासासाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यासोबतच, भारताने एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यातही भूमिका बजावली आहे. याशिवाय जर आपण शिक्षण क्षेत्राबद्दल सांगायचे झाले तर भारताने १९९६ मध्ये मालदीवमध्ये तंत्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास मदत केली. भारताने मालदीवमधील शिक्षक आणि तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रमही सुरू केला आहे. भारताच्या मदतीने मालदीवमध्ये ५३ लाख डॉलर्सचा व्यावसायिक प्रशिक्षण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
* व्यापार
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारत आणि मालदीवमधील व्यापार चार पटीने वाढला आहे. २०२२ मध्ये, दोन्ही देशांमधील व्यापार ५०० दशलक्ष डॉलर्सचा झाला. तर २०१४ मध्ये तो फक्त १७० दशलक्ष डॉलर्स होता.
* पर्यटन
मालदीवची अर्थव्यवस्था अनेक प्रकारे भारतावर अवलंबून आहे. मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या दरवर्षी वाढते. पण पीएम मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध दुरावले. भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली, त्यामुळे मालदीवची अर्थव्यवस्था कोलमडली. पण आता मुइझूला समजले आहे की भारत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मालदीव केवळ पर्यटन क्षेत्रासाठीच नाही तर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठीही भारतावर अवलंबून आहे.
मालदीवचे राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम भारताला भेट देतात. पण मुइझूने भारतापेक्षा चीन आणि तुर्कस्तानला अधिक प्राधान्य दिले. ते जानेवारीत तुर्कियेला गेला. त्यानंतर त्यांनी चीनला भेट दिली. इंडिया आऊटचा नारा देत सत्तेवर आलेल्या मुइझूने मालदीवमध्ये सरकार स्थापन करताच भारताने मालदीवमधून आपले सर्व सैन्य तात्काळ मागे घ्यावे, असे म्हटले होते. चिनी संशोधन जहाज जियांग यांग हाँग-३ ला देखील आपल्या बंदरात येण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे भारत चांगलाच संतापला होता. मात्र अवघ्या ७ महिन्यांच्या आत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या प्रभावी मुत्सद्देगिरीमुळे मालदीव वठणीवर आला आहे.
यावेळी भारताकडून मालदीवला किती मदतीची गरज आहे? याचा अंदाज या वर्षी जुलै महिन्यात मुइज्जू सरकारच्या पर्यटन मंत्र्यांनी भारत दौऱ्यावर असताना येथील अनेक शहरांमध्ये केलेल्या रोड शोवरून लावता येतो.
या संदर्भात मालदीव सरकारने वेलकम इंडिया मोहिमेची ब्लू प्रिंट तयार केली होती. याअंतर्गत भारतीय पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने मालदीवला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी भारतातील तीन प्रमुख शहरांमध्ये रोड शो केले. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये हे रोड शो झाले.