जुने गोवा सभेत मागणी : वेलिंगकरांच्या तडीपारीसाठी पोलिसांना निवेदन
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाच्या ख्रिश्चन मंत्री आणि आमदारांनी आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी. त्यांना आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जुने गोवेतील जाहीर सभेत वक्त्यांनी केली. सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी संपूर्ण गोव्यात होत असताना भारतीय जनता पक्षातील ख्रिस्ती मंत्री आणि आमदार गप्प का आहेत? असा प्रश्न जाहीर सभेत केला.
सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली आहे. रविवारीही सर्वत्र त्यांच्या अटकेची मागणी होत होती. जुने गोवा, दिवाडी आणि माशेल भागातील लोकांनी एकत्र येऊन वेलिंगकरच्या तडीपारीच्या मागणीसाठी जुने गोवा पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर लोकांनी निषेध मोर्चा काढला. जुने गोवा गांधी सर्कलजवळ जाहीर सभा झाली. प्रसाद हरमलकर, आपचे अमित पालेकर, अँथनी डिसिल्वा, अंबर आमोणकर यांची भाषणे झाली. या बैठकीत शांततेत मागणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सुभाष वेलिंगकर यांनी गोयच्या साहेबाबद्दल जे शब्द उच्चारले आहेत ते अयोग्य आहेत. आपल्या देशात सर्वधर्म समभाव आहे. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी संपूर्ण गोव्यात होत असताना भाजप सरकारमधील ख्रिश्चन मंत्री व आमदार मात्र गप्प आहेत. भूमिका स्पष्ट करता येत नसेल तर पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रसाद हरमलकर यांनी केली.
सेंट फ्रान्सिस झेवियरचा अपमान करणारे सुभाष वेलिंगकर हिंदू असू शकत नाहीत. मी हिंदू असलो तरी सर्व धर्मांचा आदर करतो. भगवद्गीता तसेच सर्व हिंदू धर्मग्रंथ सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण देतात. सुभाष वेलिंगकर हिंदू असते तर त्यांनी गोव्याच्या गोव्याच्या साहेबाविरोधात अपमानास्पद शब्द उच्चारले नसते, असे आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.