कामुर्ली कोमुनिदादने फेटाळला ‘सनर्बन’चा प्रस्ताव


07th October, 12:05 am
कामुर्ली कोमुनिदादने फेटाळला ‘सनर्बन’चा प्रस्ताव

सनबर्नला विरोध करण्यासाठी एकत्रित झालेले ग्रामस्थ. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कामुर्ली कोमुनिदादने ‘सनबर्न’ संगीत महोत्सव आयोजनाचा प्रस्ताव रविवारी सर्वसाधारण बैठकीत फेटाळून लावला. पुढील ५ वर्षे अशा महोत्सवांना परवानगी न देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. महोत्सवाच्या विरोधात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली होती.
रविवारी सकाळी सुमारे दीड तास कोमुनिदादची सर्वसाधारण सभा पंचायत सभागृहात बंद दाराआड सुरू होती. ग्रावकारांनी गावाच्या पठारावर ‘सनबर्न’ आयोजित करण्यास विरोध केला. तसाच ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कोमुनिदादच्या जागेत ‘सनबर्न’ आयोजनासाठी परवानगी द्या, असा प्रस्ताव स्पेस बाऊंड वेब लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक कार्यालयात सादर केला होता. तो कामुर्ली कोमुनिदादकडे पाठवण्यात आला होता. कोमुनिदादने गावकारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत १९८ पैकी फक्त ६८ गावकार उपस्थित होते. सभागृहाबाहेर सनबर्नला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर कोमुनिदादचे अध्यक्ष वासुदेव नाईक गावकर व अॅटर्नी हरी प्रभू पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘सनबर्न’ आयोजनासाठी जागा देण्यासंदर्भात प्रस्ताव आला होता. यावर बैठकीत चर्चा झाली व एकमताने परवानगी न देण्याचा ठराव संमत करण्यात आला. पुढील पाच वर्षे या महोत्सवाला परवानगी न देण्याचे ठरवले आहे. लोकांच्या इच्छेनुसार गावकारांनी हा निर्णय घेतला आहे.
‘सनबर्न’मुळे गावाचा फायदा होणार नव्हता, उलट शांतता भंग होणार होती. नियोजित जागी नैसर्गिक संपत्ती आणि जागृत गोबरेश्वर देवस्थान आहे. याच देवाने सर्वांना बुद्धी दिली आणि आयोजकांचा प्रस्ताव फेटाळला गेला. कथित ड्रग्जचा व्यवहार होणारे महोत्सव नकोच. काहींनी हा महोत्सव इथेच होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र गावकारांनी त्यांचा मनसुबा उधळून लावला.
_ शरद गाड, माजी सरपंच, कामुर्ली

जागेसाठी पुन्हा धावाधाव
दक्षिण गोव्यात विरोध झाल्यानंतर उत्तर गोव्यात कामुर्ली कोमुनिदादीच्या जागेत महोत्सव आयोजित करण्यासाठी आयोजकांनी प्रयत्न सुरू केले होते. कामुर्ली कोमुनिदादने आपली जागा ‘सनबर्न’ महोत्सव आयोजित करण्यास न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता या ईडीएमच्या आयोजकांना महोत्सवासाठी इतरत्र जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.