घटस्फोटितेवर लैंगिक अत्याचार; तरुणाला १० वर्षांचा सश्रम कारावास

३६ हजार रुपयांचा दंड : जलदगती, पोक्सो न्यायालयाचा निवाडा


06th October, 11:59 pm
घटस्फोटितेवर लैंगिक अत्याचार; तरुणाला १० वर्षांचा सश्रम कारावास

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बार्देश तालुक्यात २०२३ मध्ये एका घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गाडी साफ करणाऱ्या कामगाराला न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा निवाडा येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.
पीडितेने १५ मे २०२३ रोजी बार्देशमधील किनारी भागातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पीडित घटस्फोटीत असून ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एकटीच राहत होती. संशयित इमारतीतील रहिवाशांची गाडी धुण्याचे काम करत होता. १५ मे २०२३ रोजी रात्री १२.३० वा. संशयिताने गॅलरीतून तिच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. आवाज आल्यामुळे ती जागी झाली. संशयिताने मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरडाओरडा केल्यामुळे तिच्या मदतीला इमारतीतील काही लोक आले. संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम ४४८ (फ्लॅटमध्ये अतिक्रमण करणे), ३५४ (विनयभंग करणे) आणि ३७६ (लैंगिक अत्याचार करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी २६ जून २०२३ रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी प्रथमदर्शनी पुराव्यांची दखल घेऊन आरोप निश्चित करून खटला सुरू केला. न्यायालयात पीडितेने दिलेल्या पुराव्यांना घर मालकाने दुजोरा दिला. पीडितेच्या वैद्यकीय चाचणी अहवालातही लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. सरकारी वकील अर्चना भोबे यांनी पीडितेची बाजू मांडली.
न्यायालयाने संशयिताला सुनावलेल्या शिक्षा
फ्लॅटमध्ये अतिक्रमण केल्याबद्दल एक वर्षाचा सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची सश्रम कैद.
विनयभंग प्रकरणी ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची सश्रम कैद.
लैंगिक अत्याचार केल्याबद्दल १० वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची सश्रम कैद.
वरील शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. अटकेनंतर संशयिताने १ वर्ष ४ महिने २० दिवस कोठडीत घालवल्यामुळे तो कालावधी वरील शिक्षेत समाविष्ट केला आहे.