कट्टर धार्मिकता घातकच !

अठरापगड जातीधर्मियांनी व्यापलेल्या गोव्यातील धार्मिक सलोखा केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला माहीत आहे. त्याबाबतीत जगभरातून नेहमीच गोंयकारांवर कौतुकांचा वर्षाव होत असतो. अशा स्थितीत एकमेकांचे धर्म, परंपरा आणि श्रद्धास्थानांवर बेफिकीरपणे वक्तव्ये करून आणि जाणीवपूर्वक वाद पेटवून राज्यातील समता, शांततेचा भंग करणे, फार मोठा गुन्हाच आहे.

Story: संपादकीय |
06th October, 10:52 pm
कट्टर धार्मिकता घातकच !

धर्माची नशा मेंदूत भिनली की माणसातील माणूसपण नष्ट होत जाते. ‘माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ’ या धर्मवादाच्या लढाईत ‘मी म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे मी’ ही भावना उफाळून देशप्रेमास, राज्यप्रेमास तिलांजली दिली जाते आणि तेथूनच देश किंवा राज्याच्या अधोगतीस सुरुवात होते. मूठभर धर्मांधांच्या झपाटलेपणाचे दुष्परिणाम लाखो, करोडो जनतेला भोगावे लागतात आणि या धर्मांधांना पाठिशी घालून राजकीय संधीसाधू आपली पोळी पद्धतशीरपणे भाजून घेत असतात, याचे अनेक दाखले इतिहासाच्या पानापानांवर दिसून येतात.

वरील संदर्भ देण्याचे कारण म्हणजे हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक तथा ‘आरएसएस’चे माजी नेते सुभाष वेलिंगकर यांनी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवासंदर्भात केलेली मागणी आ​णि त्यावरून उफाळलेला जनक्षोभ. गेल्यावर्षी फादर बोल्मेक्स परेरा यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केले. ‘शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत. आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केलाच पाहिजे. मात्र, ते देव किंवा दैवत नाहीत,’ या त्यांच्या वक्तव्याला राज्यातील काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. पोलीस स्थानकावर मोर्चा काढून फादर बोल्मेक्स यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी परेरांवर गुन्हा नोंद केला.

इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्याचे किती​ गंभीर परिणाम समाजावर होतात, याची जाणीव झाल्यामुळेच वेलिंगकर प्रकरणात बोल्मेक्स यांनी आंदोलकांना सबुरी​चा सल्ला दिला. विविध जातीधर्माचे लोक शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या गोव्यात धर्मावर भाष्य केल्यास त्याचे दुष्परिणाम किती होतात, याची जाणीव स्वत:ला हिंदू रक्षक म्हणवून घेणाऱ्या वेलिंगकरांना निश्चितच आहे. तरीही दरवर्षी जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव प्रदर्शन जवळ आले की वेलिंगकरांची त्याविरोधातील लेखणी सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून जुने गोवे फेस्ताच्या दरम्यान हा प्रयोग ते सातत्याने करीत होते. परंतु, यंदा त्यांनी सेंट झेवियरच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी करण्याची मागणी करून एक पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते गायबही झाले. पण, त्यांच्या या एका पायाच्या बदल्यात सेंट झेवियरच्या भाविकांचे हजारो पाय रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलने छेडली, रास्ता रोको केला, वाहतूक व्यवस्था ठप्प केली, या सर्वांचा सर्वसामान्य जनतेला किती आणि कसा फटका बसला, हे शनिवार व रविवारी दिसून आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याची हमी दिल्यानंतर आणि चर्चसंस्थेच्या आवाहनानंतर आंदोलकांनी र​विवारी आंदोलन मागे घेतले. त्याचवेळी हिंदू संघटनांनी वेलिंगकरांना समर्थन देत सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सभेतील उपस्थिती पाहून सर्वसामान्य हिंदू समाजाला या वादात पडण्यात अजिबात रस नसल्याचे कळून येते. गेले दोन दिवस या विषयावरून माजलेला गदारोळ थांबवून राज्यातील शांतता अबाधित राखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हिंदू संघटनांनी वाद पुन्हा वाढवण्याच्या दृष्टीने सुरू केलेले प्रयत्न जनतेला रुचल्याचे दिसत नाही. इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर बोलणे म्हणजे स्वत:च्या धर्माचे स्थान अधोरेखित करणे असा समज असलेल्यांना पाठिंबा देत असताना स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाने स्वत:च्याच मेंदूने विचार करणे, वास्तवाचे भान ठेवणे आणि अशा गोष्टींमागील राजकीय कटकारस्थाने ओळखणे गरजेचे आहे.

अठरापगड जातीधर्मियांनी व्यापलेल्या गोव्यातील धार्मिक सलोखा केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला माहीत आहे. त्याबाबतीत जगभरातून नेहमीच गोंयकारांवर कौतुकांचा वर्षाव होत असतो. अशा स्थितीत एकमेकांचे धर्म, परंपरा आणि श्रद्धास्थानांवर बेफिकीरपणे वक्तव्ये करून आणि जाणीवपूर्वक वाद पेटवून राज्यातील समता, शांततेचा भंग करणे फार मोठा गुन्हाच आहे. असा गुन्हा करणाऱ्याला अजिबात सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी सर्वच धर्मांतील तथाकथित रक्षकांना दिला आहे. पण, असे इशारे येण्याऐवजी परंपरागत चालत आलेली गोव्याची समृद्ध धार्मिक संस्कृती ‘गोंयकार’ या नात्याने प्रत्येकाने स्वत:हून जपणे आवश्यक आहे.

एकंदरीत, ज्यांनी वाद पेटवला ते वेलिंगकर अजूनही गायब आहेत. आपण जशी मागणी केली त्याचप्रमाणे कुठल्याही कायदेशीर कारवाईला त्यांनी सामोरे जायला हवे होते. त्यांनी केलेली मागणी त्यांच्या मते योग्य असेल तर कारवाईला घाबरण्यात काही अर्थ नाही. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलीस आणि न्यायालयाकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच आहे. पण, बोल्मेक्स परेरा, सुभाष वे​लिंगकर यांच्या माध्यमातून कट्टर धार्मिकता राज्यासाठी किती घातक आहे, याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे किमान या प्रकरणातून राज्यातील स्वयंघोषित धर्मरक्षकांनी धडा घेणे आणि लोकांची माथी न भडकावता गोव्यातील धार्मिक सलोखा कायमस्वरुपी जिवंत ठेवणे काळाची गरज आहे.