एक हजार महायुगे झाली म्हणजे सत्यलोकात ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो व तेवढ्याच काळाची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या या अशा एका दिवसात स्वर्गामध्ये १४ इंद्र होऊन जातात! पण अर्जुना, अशा त्या थोर विभूतीलाही जन्म-मृत्यू आहेच ना?
श्रीमद् भगवद्गीताचा अध्याय आठवा, अक्षर-ब्रह्म-योग; श्लोक १७ पासून पुढे चालू - हे अर्जुना, १७,२८,००० सौरवर्षांएवढे कृतयुग, १२,९६,००० सौरवर्षांएवढे त्रेतायुग, ८,६४,००० सौरवर्षांएवढे द्वापरयुग व ४,३२,००० सौरवर्षांएवढे कलियुग अशी ब्राह्मकालगणनेची माने आहेत. या चारही युगांची एकंदर वर्षें ४३,२०,००० होतात. एवढ्या काळाला एक 'महायुग' असे म्हणतात. अशी एक हजार महायुगे झाली म्हणजे सत्यलोकात ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो व तेवढ्याच काळाची त्याची एक रात्र असते. हे सत्यलोकीचे दिवस आणि रात्र जे बघू शकतात ते स्वर्गीचे अमर चिरंजीव खऱ्या अर्थाने भाग्यवान होत. स्वर्गीचा राजा इंद्राची दशा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या या अशा एका दिवसात स्वर्गामध्ये १४ इंद्र होऊन जातात! मग तिथले इतर देवगण जे आहेत, त्यांची काय स्थिती असेल याची कल्पना कर. जे ब्रह्मदेवाचे आठही प्रहर आपल्या डोळ्यांनी बघू शकतात त्यांना 'अहोरात्रविद्' (म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र यांचे ज्ञान असणारा) असे म्हणतात. खरेतर ते स्वतःच 'ज्ञान' असतात!
अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे।
रात्र्यागमे प्रलीयन्ते
तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।१८।।
भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते।
रात्र्यागमेsवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।१९।।
सरळ अर्थ : म्हणून त्यांना हेही माहीत असते की सर्व दृश्यमात्र भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच तो त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातच लय पावतो. अर्थात् कालाने मर्यादित असल्याने ब्रह्मलोकही अनित्य समजतात.
आणि हे अर्जुना, तोच हा भूतसमुदाय उत्पन्न होऊन प्रकृतिवश असल्यामुळे रात्रीच्या सुरवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. याप्रमाणे ब्रह्मदेवाची शंभर वर्षे पूर्ण होताच आपल्या ब्रह्मलोकासह तोही शांत होऊन जातो.
विस्तृत विवेचन : त्या ब्रह्मलोकाचा दिवस उजाडायला लागला की स्वभावतःच अव्यक्त दशेमध्ये असलेले हे सगळे विश्व ज्याची गणना करता येणे शक्य नाही अशा व्यक्त दशेमध्ये यायला लागते आणि त्याच्या मापदंडानुसार त्या दिवसाचे चार प्रहर पूर्ण होताच तो सगळा आकार-सागर आटून जातो! पुढचे चार प्रहर पूर्ण होताच पहाटेला तो आकार-सागर परत रूपास यायला लागतो!
शरद ऋतूच्या आरंभी ढगांच्या रांगा आकाशात जिरून जायला लागतात आणि हे किरीटी, ग्रीष्मकाळ संपता संपता पुन्हा त्या तिथेच उद्भवतात. तसेच भूतसृष्टीच्या समूहांचे होत असते. ब्रह्म-दिनारंभी ते उद्भवतात आणि एक हजार महायुगे होईपर्यंत तसेच व्यवहार-रत असतात. ब्रह्म-रात्र व्हायला लागली की ते अव्यक्तांत लय पावतात. ब्रह्म-रात्र संपून जरासे अळुमाळू उजाडायला लागले की परत ते भूत-सृष्टी-समूह व्यक्ततेत यायला लागतात. हे सत्यलोकीचे अहोरात्र होय. विश्वाची उत्पत्ती आणि संहार याचेच हे सार होय. सृष्टिबीजाची साठवण हे ब्रह्मदेवाचे थोरपण खरेच. पण अर्जुना, अशा त्या थोर विभूतीलाही जन्म-मृत्यू आहेच ना? तो काही त्याला चुकत नाही!
जेव्हा ही भूत-सृष्टी व्यक्तातून अव्यक्तांत जाते तेव्हा ती साम्यावस्थेस प्राप्त होते. त्या स्थितीत असणे म्हणजे भूतसृष्टीचे साम्य होय.
परस्तस्मात्तु भावोsन्योsव्यक्तोs
व्यक्तात्सनातन:।
य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।२०।।
सरळ अर्थ : परंतु त्या अव्यक्ताहून अती पलिकडचा दुसरा अर्थात् विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो सच्चिदानंदघन पूर्णब्रह्म परमात्मा सर्व भूतांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही.
विस्तृत विवेचन : तिथे भूत, न्यून, अधिक या संज्ञाच उरत नाहीत. जसे मुरून दही झाल्यानंतर दुधाचे नाम आणि रूप नाहीसे होते तसे साम्यात म्हणजे अव्यक्तांत गेले की जगाचे जग-पण लोप पावते. पण ज्या अव्यक्तापासून ते आकाराला येते त्याचे अव्यक्तपण हे जग आकाराला आले तरी आणि नाही आले तरी जसेच्या तसेच राहते! त्यात स्थित्यंतर होत नाही. आकारले की त्याला व्यक्त म्हणतात. अशी ही नावं एकमेकांवर अवलंबून आहेत खरी, पण मुळात वस्तू एकच आहे! सोन्याचे अलंकार आटविले की त्यांची लगड होते. त्यातून परत अलंकार केले की ती लगड ही लगड उरत नाही. लगड आणि अलंकार दोन्ही सोन्याचेच. सोने हाच त्यांचा आधार. तद्वतच निराकार व साकार हे दोन्ही वेगळे भासले तरी त्या दोहोंचा आधार एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्म. ते व्यक्त नाही, अव्यक्त नाही, नाशिवंत नाही आणि नित्यही नाही! व्यक्त आणि अव्यक्त हे दोन्ही भाव गिळून ते आपले विश्व-पण लोप न होऊ देता आपणच नित्यसिध्द विश्वाकार होऊन असते. जशी अक्षरे जरी पुसून टाकली तरी त्यांचा अर्थबोध हा लोप पावत नाही, पाण्यावर लाटा कितीही आल्या-गेल्या तरी पाण्याचे पाणी-पण काही लोपत नाही! दागिन्याच्या स्वरूपात असले किंवा लगडीच्या स्वरूपात असले तरी जसे सोन्याचा सोने-पणा आटत नाही, तसे मर्त्य जीवांमध्ये अमर, नित्य अशी जी काही वस्तू असते ती कधीही नाहीशी होत नाही. तेच परब्रह्म होय.
अव्यक्तोsक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तध्दाम परमं मम ।।२१।।
पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लब्धस्त्वनन्यया ।
यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।२१।।
सरळ अर्थ : आणि ज्याला अव्यक्त अक्षर असे म्हटले जाते त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परम गती म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असता लोक उलट मागे येत नाहीत, ते माझे परम धाम होय.
आणि हे पार्था, ज्या परमात्म्याच्या अंतर्गत सर्व भुते आहेत व ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व विश्व परिपूर्ण भरलेले आहे तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीने लाभणारा आहे. (क्रमशः)
- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३