पणजीत स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे सुरू झाली आहेत. रस्त्यांच्या बाजूला पदपथ बांधणे, पथदीप उभारणे, लँडस्केपिंग, झाडे लावणे आदी कामे सध्या सुरू आहेत. सध्या रस्त्यावर जेसीबी किंवा अन्य मोठी वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतोय, मात्र वाहतूक पोलीस गायब आहेत. पणजीकरांना गेल्या काही वर्षांच्या दुःखद अनुभवामुळे अशा स्मार्ट दुखण्यांची सवय झाली आहे. बंद रस्ते, धूळ प्रदूषण, खड्डे, चिखलमय रस्ते, वाहतूक कोंडीच्या अनुभवामुळे स्मार्ट सिटीच्या शिल्लक कामांसाठी पणजीकर पुन्हा सोशिक होतील, अशी खात्री कदाचित प्रशासनाला असावी.
स्मार्ट सिटी अंतर्गत सांत ईनेज परिसरातील रस्ते बांधणे, भूमिगत सांडपाणी वाहिन्या घालणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अन्य वाहिन्या रस्त्याच्या एका बाजूला घालणे अशी कामे केलेली आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली तर काही अंतिम टप्प्यात आहेत. अर्थात पणजीतील १८ जून आणि डॉ. आत्माराम बोरकर रस्त्याचे काम अद्याप हाती घेतलेले नाही, ही गोष्ट वेगळी. पावसाळ्यापूर्वी घाईघाईने सिमेंट टाकून भरण्यात आलेल्या या दोन्ही रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. लोकांनी आवाज उठवला तरच प्रशासन केवळ मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्यात धन्यता मानते. या दोन्ही रस्त्याच्या बाजूला अनेक व्यावसायिक अस्थापने आणि सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे लोकांचे येणे जाणे जास्त असते. अशात येथे काम सुरू झाल्यावर नागरिकांना त्रास कमी होण्यासाठी आतापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. नुकतेच भाटले - अल्तिनो रस्त्यावर पुन्हा खोदकाम सुरू झाले. त्यामुळे येथील लोकांना जवळच जायचे असेल तरी मोठा वळसा घालावा लागतो. रायबंदर येथील रस्त्यांची स्थिती अजूनही भयानक आहे. पणजीत स्मार्ट सिटीच्या काही रस्त्यावर भेगा पडायला सुरू झाले आहे. विरोधकांनी वेळोवेळी स्मार्ट सिटीच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. नुकताच केंद्रीय नगर विकास खात्याने राज्यातील नगरविकास खात्याच्या सचिवांना या आरोपात काही तथ्य असल्यास त्याची पुढील चौकशी करण्यास सांगितले आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा ठेवूया. आपण भूतकाळात केलेल्या चुकांपासून धडे घेणे आवश्यक असते. एकच चूक वारंवार करणे हे स्मार्टपणाचे लक्षण नाही. निदान यावेळी तरी स्मार्ट सिटीचे स्मार्ट अधिकारी यावर विचार करतील ही अपेक्षा. प्रशासनाने सामान्य लोकांना गृहीत धरू नये. कारण एकदा सोशिकता संपली की कोणती परिस्थिती निर्माण होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
- पिनाक कल्लोळी