गोव्याचे 'कास पठार'

कारवीचे झुडूप सात वर्षानंतर एकदा बहरते, बियाणे तयार करते व निसर्गातील बऱ्याच गोष्टी जिवंत करत स्वतः मरुन जाते. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा फुलवण्यासाठी!

Story: साद निसर्गाची |
06th October, 03:14 am
गोव्याचे 'कास पठार'

फूल! थोरामोठ्यांपासून लहान मुलांना आपल्या रंग व सुगंधाने आकर्षित करणारा जैवविविधतेतील एक महत्त्वाचा घटक. काही फुले नित्याने बहरतात, काही फुले मौसमी असतात, तर काही फुले ही कित्येक वर्षांनंतर फुलतात. यंदाच्या वर्षी पश्चिम घाटाच्या पर्वत रांगेत फुललेले 'कारवी' हे असेच एक फूल. गडद जांभळ्या रंगाचे, मध्यम आकाराचे हे फूल तब्बल सात वर्षांनी फुलते. यंदाच्या वर्षी चोर्ला घाटात फुललेली कारवीची फुलं पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. 

कारवी फुलाचे सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आम्हीही चोर्ला घाटाची वाट धरली. निसर्गभ्रमंतीसाठी आम्ही भल्या पहाटेच बाहेर पडलो. निरव शांतता, दाट धुके, पक्षांचा नुकताच सुरू झालेला किलबिलाट, शुद्ध हवा व झाडांच्या फांद्यांमधून वाट काढू पाहणाऱ्या सूर्यकिरणांचा आनंद लुटत आम्ही पदभ्रमण करत निसर्गाचा निळा-जांभळा गालिचा पहाण्यासाठी निघालो. 

‘स्ट्रोबिलान्थेस कॅलोसा’ म्हणून ओळखली जाणारी कारवी फक्त पश्चिम घाट आणि द्वीपकल्पीय भारतातच आढळते. गुलाबी, जांभळ्या, निळ्या रंगाने व्यापलेला चोर्ला घाट पहायला अत्यंत सुंदर दिसत होता. भरपूर फुले व ज्या त्या फुलामधील मधूरसाचा आस्वाद घेत स्वच्छंदपणे विहार करणारी रंगीबेरंगी फुलपाखरे! हा नजारा पाहण्याजोगा होता. 

गोव्याला कर्नाटक राज्याशी जोडणारा चोर्ला घाट हा जैवविविधतेने समृद्ध असलेला प्रदेश. दऱ्या खोऱ्यातून वाट काढत उंच कड्यावरुन कोसळणारे दुधाळ धबधबे ह्या घाटातील प्रमुख आकर्षण. येथे सात वर्षांनंतर फुललेली कारवीही यंदाच्या वर्षी पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहे. तब्बल सात वर्षांनंतर फुलणारे हे दुर्मिळ फूल कितीतरी किटक, पक्षी, मधमाशा, फुलपाखरे इत्यादींना आकर्षित करुन ह्या प्रदेशाची जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.

घाट परिसरातील लोक कारवी फुलण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात असे समजले व त्यामागचे कारण समजून घेण्यासाठी आम्ही येथील गावातील लोकांशी संवाद साधला. मधमाशांच्या पोळ्यातील मध काढून विकणे हा येथील लोकांचा पारंपरिक व्यवसाय. कारवी फुलल्यानंतर ह्या परिसरात विशिष्ट प्रकारच्या मधमाशा पहायला मिळतात असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ह्या मधमाशा एरवी आढळणाऱ्या मधमाशांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. कारवी बहरते त्या काळात मधमाशांची संख्या वाढल्याने मधाचा साठाही वाढतो ज्यामुळे जास्त नफा मिळतो असे स्थानिकांनी सांगितले. हे मध पौष्टिक आणि औषधी गुणधर्माने युक्त असते. कारवीच्या फुलण्याने आदिवासी व जंगल निवासीच नव्हे तर पशु-पक्षीही सुखावतात. कारवीच्या झुडपाची पाने गवे रेडे अतिशय आवडीने खातात. कारवीचा रस कुष्ठरोग आणि खरूज घालवण्यास उपयुक्त ठरतो. काही कारणास्तव शरीरावर सुज आलेली असेल तर ती कमी करण्यासही कारवीचा रस उपयुक्त आहे असेही यावेळी ग्रामस्थांकडून समजले. 

डोंगराच्या कडेला किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कारवीची असंख्य झुडपे फुललेली असल्या कारणाने पदभ्रमण करणे शक्य नसलेल्या व्यक्ती देखील घाटमाथ्यावर बहरलेल्या रंगीबेरंगी फुलांचा आनंद लुटू शकतात. घाटमाथ्यावर पदभ्रमण करण्यासाठी जाताना अंगाला जळू लागण्याची भीती असते. जळू म्हणजे जंगलात फिरताना अंगावर चढून रक्त पिणारा जीव. हा जीव जरी विषारी नसला तरीही तो चावल्यास आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जळू चावण्यापासून रोखण्यासाठी आपण इन्सेक्ट रीपेलन्ट क्रिम किंवा मीठाचा वापर करु शकतो. 

जांभळ्या, निळ्या, गुलाबी रंगाच्या व्यतिरिक्त यंदा पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाची कारवी फुलल्याचे पर्यावरण अभ्यासकांच्या निदर्शनास आले. उत्परिवर्तनामुळे एरवी फुलणाऱ्या फुलांपेक्षा वेगळ्या रंगाची फुलं फुलली असावी असा निष्कर्ष संशोधक काढत आहेत. 

कारवीचा जीवनकाळ आठ वर्षांचा असतो. बहर ओसरला की ह्या झुडुपाला फळे येतात. मग पुढील मान्सूनच्या काळात ही फळे जमिनीवर पडून कारवीची बियाणे उगविण्याची प्रक्रिया सुरू होते. कारवी पूर्णपणे सुकायला एक वर्ष घेते. प्रत्येकवर्षी पावसाच्या आगमनानंतर या वनस्पतीला पाने येतात पण ती फुलत नाही. दरवर्षी पावसाळा संपला की पाने गळून केवळ खोड शिल्लक राहते. ही प्रक्रिया पूर्ण होऊन कारवी परत फुलेपर्यंत सात वर्षे उलटून जातात.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या 

प्राध्यापिका आहेत.)