भारतीय रेल्वे प्रशासन आणि यु.पी.एस.सी.

१०वी पास ते पदव्युत्तर विद्यार्थी रेल्वेमध्ये विविध भरतीसाठी अर्ज करू शकतात. रेल्वे नोकऱ्या ४ श्रेणींमध्ये विभागल्या जातात. तुमच्या पात्रतेच्या आधारावर रेल्वेमध्ये नोकरी मिळवता येते.

Story: यशस्वी भव: |
06th October, 04:11 am
भारतीय रेल्वे प्रशासन  आणि यु.पी.एस.सी.

भारतीय रेल्वे प्रशासनात एकूण १६ लाख कर्मचारी काम करतात. एक प्रचंड असे प्रशासन याला लागते. जवळपास गोव्याच्या लोकसंख्येएवढे कर्मचारी येथे काम करतात. यांची वार्षिक उलाढाल ही ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ अशी असते. हा सर्व डोलारा एकटा दुकटा सांभाळू शकत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक यु.पी.एस.सी.मधून निवडलेले सिव्हिल सर्व्हंट येथे कामासाठी घेतले जातात. 

यु.पी.एस.सी.च्या अंतर्गत रेल्वे रेक्रूटमेंट बोर्ड स्थापन केलेला आहे व त्या बोर्डच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षा घेऊन कर्मचारी निवडले जातात. अर्थातच आयएएस, आयपीएसपेक्षा खूप पटीने सोप्या असलेल्या परीक्षेतूनच ही निवड होते. विषय साधारणपणे तेच असतात. परंतु काठिण्य पातळी कामाच्या दर्जानुसार बदलत असते. आयएएस, आयपीएस स्तरावरील उच्च अधिकारी या ठिकाणी वरिष्ठ प्रशासनात असतात. एकाच सी.एस.इ अर्थात सिव्हिल सर्विस एक्झाममधून जे विद्यार्थी ‘रेल्वे’ हा पर्याय निवडतात, त्यांना त्या प्रशासनात नेमले जाते. आठवी पासपासून आय.ए.एस. पर्यंतची पदे रेल्वेमध्ये भरली जातात. मुळातच टेक्निकल, नॉन टेक्निकल, एडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, पोलीस अशी सर्वसाधारणपणे विभागवार विभागणी असते. टेक्निकलमध्ये इंजिनियर्स निवडले जातात. रेल्वे रूळ, इंजिन, डबे बनवणे, यांत्रिकीकरण, बोगदे, नवीन मार्ग असे काम टेक्निकल या विभागातून होते. रेल्वे तयार करण्यापासून रेल्वे देखभाल व चालवणे या प्रकारात ही माणसे काम करतात. काही अभियंते इंडियन इंजीनियरिंग सर्व्हिसेस आय.ए.एस. या परीक्षेतून निवडले जातात व ते आयएएस प्रमाणे आय.ई.एस. या पदावरून कामकाज बघतात. नॉन टेक्निकलमध्ये ऍडमिन, एच.आर., लीगल, कॉम्प्युटर, आय.टी.बी.ए., बी.कॉम., बी.फार्म., केटरिंग अशा वेगवेगळ्या सेवांसाठी कर्मचारी भरले जातात. फायनान्स विभागात बी.कॉम., सी.ए.,सी.एस., एल.एल.बी., सी.एम.ए.आय.सी. डब्ल्यू.ए. अशी वाणिज्य मधील तज्ञ भरली जातात. रेल्वेचा लेखाजोखा, पैसे, भांडवल उभारणे, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट या कामासाठी असे कर्मचारी निवडले जातात. 

१०वी पास ते पदव्युत्तर विद्यार्थी रेल्वेमध्ये विविध भरतीसाठी अर्ज करू शकतात. रेल्वे नोकऱ्या ४ श्रेणींमध्ये विभागल्या जातात. तुमच्या पात्रतेच्या आधारावर रेल्वेमध्ये नोकरी मिळवता येते. यामध्ये अ, ब, क आणि ड गटांतर्गत नोकऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. यापैकी गट A आणि B मध्ये अधिकारी श्रेणी नियुक्त केल्या जातात. गट अ साठी भरती यूपीएससीद्वारे केली जाते. यामध्ये तुम्हाला नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा किंवा एकत्रित वैद्यकीय परीक्षा द्यावी लागते. त्याची भरती रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड करत नाही. गट अ साठी अर्ज करण्यासाठी, अभियांत्रिकी, एमबीबीएस किंवा एमएससी पदव्युत्तर पात्रता असणे अनिवार्य आहे. 

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात पोलीस विभाग संरक्षणाचे काम करते. प्रत्येक विभागाची परीक्षा, वेळ, पदे, कालावधी त्या त्या वेळेच्या गरजेनुसार असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या संकेतस्थळाशी अनुरूप होणे गरजेचे असते. एम्प्लॉयमेंट न्यूज, रोजगार समाचार या वृत्त पत्रांमध्ये रेल्वे परीक्षेचे सर्व तपशील असतात. www.indianrailways.gov.in या संकेतस्थळाद्वारे सर्व माहिती उपलब्ध असते. यु.पी.एस.सी.च्या अंतर्गत परीक्षा घेतली जाते व अशा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून विद्यार्थी भारतीय रेल्वेत आपली कारकीर्द करू शकतो.


अॅड. शैलेश कुलकर्णी

कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि 

करिअर समुपदेशक आहेत.)