‘विवेकानंद पर्यावरण जागृती फौज’ या संस्थेने दोन दिवसांचे ‘मिस्टिक आंबोली ट्रेल्स’ शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे आयोजन माझे बाबा करत असल्यामुळे, आम्ही शिबिर सुरू होण्याआधीच निसर्गरम्य आंबोली गावात पोहोचलो होतो. माझ्या बाबांसोबत मला निसर्ग अभ्यासाच्या निमित्ताने अनेक वेळा आंबोलीत यायची संधी मिळाली आहे. तिथेच बाबाचे मित्र पराग रांगणेकर मामा फुलापाखरावर अभ्यास करणारे. यांचे ‘मृगया नेचर रिट्रीट रिसॉर्ट’ आहे, जिथे हे शिबिर भरवले होते.
शिबिर सुरू होण्याआधी आम्ही काही वेळ वाट पाहिली, मग हळूहळू ओळखीचे आणि अनोळखी लोक येऊ लागले. सगळ्यांमध्ये सर्वात लहान मीच होते. शिबिर वेळेत सुरू झाले आणि सर्वांनी आपली ओळख सांगण्यासाठी एक छान Ice-breaking activity घेतली. मी लाजून माझं नाव पालवी संकेत नाईक, डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल, अस्नोडा सांगितलं आणि लगेच खाली बसले.
विठ्ठल मामाने शिबिराचं वेळापत्रक स्पष्ट करून दिलं. आंबोलीतील जैवविविधतेचे राखणदार काका भिसे यांनी प्रोजेक्टरवर आंबोलीच्या उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, कीटक यांच्याबद्दल माहिती दिली. माझ्यासाठी या शिबिराचं खास आकर्षण होतं ‘नाइट ट्रेल’. आम्हाला दोन गटांमध्ये विभागलं, मी दुसऱ्या गटात होते. आमचा फील्ड गाइड रमेश मामा, तर पहिल्या गटाचा गजानन मामा होते. दुसऱ्या दिवशी ‘डे ट्रेल’ भ्रमंतीच्या वेळी आमच्यासोबत गजानन मामा होते. दोन्ही मामांना फील्डवरील खूप ज्ञान होतं आणि त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. त्यात आम्ही गेको, फ्रॉग, साप, टोड, कीटक आदिचा समावेश होता. माझ्या वहितील यादी मी खाली लिहीत आहे. व्हाईट बॅण्डेड ग्राउण्ड गेको, प्रशाद्स् गेको, मार्बलड टोड, ब्रूक्स हाऊस गेको, आंबोली टोड, क्रिकेट फ्रॉग, बोईंग फ्रॉग, इंडियन बलून फ्रॉग, मलाबार ग्लायडिंग फ्रॉग, मालाबारी चापडा, हरणटोळ, मांजऱ्या साप आदी.
शिबिरामध्ये एक फोटो प्रश्नमंजुषा घेण्यात आली. २० फोटोंपैकी मी १५ फोटो ओळखले आणि त्यामुळे मला भाई मामानी लिहिलेली विशेष भेट मिळाली – ‘Sacred Flora of Goa & The Way we Were’ ही दोन सुंदर पुस्तकं. मोबाईल फोटो स्पर्धा होती त्यामुळे मी माझ्या बाबाच्या मोबाईल मधून Coral fungi चा फोटो काढला व बक्षिस प्राप्त केले. या शिबिरात मला खूप छान शिकायला मिळालं, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.
पालवी संकेत नाईक