वेलिंगकरांवर कारवाईसाठी मडगावात रास्ता रोको

सेंट झेविअर वक्तव्य प्रकरणी संताप : रात्री उशिरापर्यंत पोलीस मुख्यालयासमोर जमाव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22 hours ago
वेलिंगकरांवर कारवाईसाठी मडगावात रास्ता रोको

मडगाव : सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेविअरबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत शेकडो नागरिकांनी शुक्रवारी सायंकाळी दक्षिण गोवा जिल्हा पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला. राज्यभरात तक्रारी होऊनही गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सांगत आंदोलकांनी रास्ता रोको केला. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात डिचोली पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर राज्यातील विविध भागातील पोलीस ठाण्यात ख्रिस्ती बांधवांनी वेलिंगकरांविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत. या घटनेला तीन दिवस झाल्यानंतर पोलिसांकडून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयावर सर्वधर्मीय नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी पोलीस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष देसाई व मडगाव पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार क्रुझ सिल्वा, प्रतिमा कुतिन्हो, साविओ कुतिन्हो व इतर आंदोलक उपस्थित होते.

त्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आल्यावर आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा केली. राज्याच्या विविध भागातून आलेल्यांनी वेलिंगकरांवर कारवाई करण्यासंदर्भातील तक्रारीवर स्वाक्षरी केलेले निवेदन पोलीस अधीक्षकांना सादर केले. वेलिंगकर यांच्याकडून वारंवार ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये होत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. राज्यातील मंत्री व आमदारांकडूनही या वक्तव्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर बसून राहणार असे सांगत रस्त्यावर ठाण मांडले.

कारवाईसाठी रस्ते केले बंद

पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी घटनास्थळी येत आंदोलकांना त्यांनी केलेल्या तक्रारीची प्रत डिचोली स्थानकाला पाठवल्याचे सांगितले. मात्र, आंदोलकांकडून गुन्हा नोंदची मागणी करत वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यांवर धाव घेतली व गाड्या अडवल्या. पोलिसांनी अडवूनही आंदोलकांनी मडगावातील बागेच्या बाजूचे रस्त्यावरील वाहतूक बंद केली. यामुळे वाहतूक दुसर्‍या रस्त्यांवरुन वळवण्याची वेळ आली.

फातोर्डा, कुडतरी पोलिसांत तक्रारी

सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राय पंचायत सदस्यांसह अँथनी बार्बोझा यांनी मायना कुडतरी पोलिसात तक्रार दाखल केली. याशिवाय मिलाग्रीस फर्नांडिस यांनी नागरिकांसह फातोर्डा पोलिसांत तक्रार दाखल करत वेलिंगकरांवर कारवाईची मागणी केली.

दक्षिण गोवा काँग्रेसकडून अटकेची मागणी

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. काणकोण येथे मुस्लिम बांधवांबाबत बोलण्यात येते. त्यानंतर कुंकळ्ळीत मुस्लिम बांधवाला मारहाण होते तर आता वेलिंगकरांकडून सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा अवमान करणे यातून राज्यातील धार्मिक फूट वाढत आहे. त्यामुळे वेलिंगकरांना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत अटक करण्याची मागणी मरिनो रिबेला, साविओ डिसिल्वा, साविओ कुतिन्हो यांनी केली. 

हेही वाचा