तिसवाडी: उत्तर गोव्यात १० टक्के पूल, साकव पोर्तुगीजकालीन

६५० पुलांचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 11:39 pm
तिसवाडी: उत्तर गोव्यात १० टक्के पूल, साकव पोर्तुगीजकालीन

पणजी: उत्तर गोव्यात तपासणी केलेल्या ६५० पुलांपैकी १० टक्के पूल पोर्तुगीज काळातील आहेत. हे पूल ६० वर्षांहून अधिक जुने आहेत. या पूलांचे संपूर्ण ऑडिट आणि माहिती मिळाल्यानंतरच यांचे वय कळेल, असे सूत्रांनी सांगितले. सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अॅलन परेरा यांनी दिली. 

पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सरकारने स्ट्रक्टवेल डिझायन अॅण्ड कन्सलटन्सी या मुंबईस्थित कंपनीला कंत्राट दिले आहे. कंपनीने आतापर्यंत उत्तर गोव्यातील ६५० पूल आणि साकवांची प्राथमिक तपासणी केली आहे. तपासणीनंतर प्रत्येक पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे. यासाठी वेळ लागेल. 

उत्तर गोव्यातील १० टक्के पूल हे पोर्तुगीज काळातील म्हणजेच ६० वर्षांहून अधिक जुने असल्याचे तपासणीत समोर आले आहे. पुलाचे फोटो, आराखडा आणि काँक्रिटचे मूल्यमापन झाल्यानंतरच पुलाचे वय कळू शकेल, असे कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रशेखर यांनी सांगितले. उत्तर गोव्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सध्या सुरू आहे. दक्षिण गोव्यात अद्याप काम सुरू झालेले नाही, असे ते म्हणाले. 

मांडवी, झुआरी आणि बोरी पुलांची नियमित तपासणी केली जाते. यासाठी वार्षिक ५ कोटीपेक्षा जास्त खर्च करण्याची गरज नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अॅलन परेरा यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतरच पुलांची स्थिती कळेल. तसेच धोकादायक असलेल्या पुलांचा योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा