सासष्टी: अभिजात भाषेच्या गटामुळे इतर भाषांमध्ये दुजाभावाची भावना : मावजो

मराठी भाषेला हा दर्जा खूप उशिरा मिळाला : मावजो

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 11:49 pm
सासष्टी: अभिजात भाषेच्या गटामुळे इतर भाषांमध्ये दुजाभावाची भावना : मावजो

मडगाव : मराठी ही एक प्रगत भाषा आहे, यात दुमत नाही. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही चांगली बाब आहे. मात्र, अभिजात भाषा म्हणून काही निकष लावून एक गट तयार करणे यामुळे उर्वरित भाषेंच्या बाबतीत दुजाभाव केल्याची स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे यावर पुनर्विचार होण्याची गरज आहे, असे मत कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबाबत प्रतिक्रिया देताना  मावजो यांनी सांगितले की, अभिजात भाषा म्हणून आतापर्यंत ज्या भाषांना दर्जा मिळालेला आहे ते पाहता मराठी भाषेला हा दर्जा खूप उशिरा मिळालेला आहे. 

मराठी या भाषेला अभिजात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा होता. ओडिया, तेलगु सारख्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला होता पण मराठी भाषेला हा दर्जा का दिला गेला नव्हता हे आपल्या आकलनापलीकडील होते, असेही ते म्हणाले.

विकसित भाषांना अभिजात भाषेंचा दर्जा देणे म्हणजेच उरलेल्या भाषांमध्ये स्पृश्य व अस्पृश्यतेसारखा किंवा एक मोठी व दुसरी लहान भाषा असा भेदभाव निर्माण करण्यास हे कारणीभूत ठरणार आहे. आज ना उद्या सर्व भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दुसर्‍या भाषेला कमी लेखल्यासारखे होऊ शकते. यातून कोणतीही भाषा कमी दर्जाची आहे असे नाही. बंगाली भाषेची उपभाषा म्हणून वाद असलेल्या भाषेला आधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला व बंगाली भाषेला त्यानंतर मिळाला हे समजण्यासारखे नाही, असे मावजो म्हणाले.      

हेही वाचा