सासष्टी: मडगाव सोपो कर घोटाळाप्रकरणी संशयित लिपिक पोलिसांना सापडेना

पालिकेचे पैसे जमा होण्यात अडचणी : पालिका मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 11:36 pm
सासष्टी:  मडगाव सोपो कर घोटाळाप्रकरणी संशयित लिपिक पोलिसांना सापडेना

मडगाव : मडगाव पालिकेला फेस्ताच्या फेरीतून मिळालेल्या सोपो कराच्या साडेसतरा लाखांचा घोटाळा कनिष्ठ लिपिक योगेश शेटकर याने केला. त्याशिवाय वायफायसाठी दिलेला साडेसतरा हजारांचा धनादेश वैयक्तिक खात्यात जमा केला. 

 महसूलाची कमी असलेल्या मडगाव पालिकेचे हे पैसे पुन्हा मिळण्याची आशा आता मावळत आहे. मडगाव पोलिसांना पालिकेचा लिपिक अजूनही शोधून सापडत नाही. 

मडगाव पालिका महसुलाच्या बाबतीत सध्या कठीण काळातून जात आहे. फेस्ताच्या फेरीतून मिळालेल्या सोपो कराच्या पैशांचा घोटाळा समोर आला. त्यातच पालिकेतील हे घोटाळ्यांचे पैसेही पुन्हा तिजोरीत जमा होत नाही अशी परिस्थिती आहे. 

नागरिकांनी आणलेल्या दबावानंतर मडगाव पालिकेकडून कनिष्ठ लिपिक योगेश शेटकरविरोधात मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मडगाव पालिकेच्या तक्रारी नंतरही पोलिसांनी चार दिवसांनी गुन्हाही नोंद केला. 

मात्र, त्या दिवसापासून योगेश शेटकर हा पोलिसांना सापडला नाही आहे. तो घरी नसून मोबाइल बंद असल्याची कारणे पोलिसांकडून देण्यात येत आहेत. सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतर मडगाव पोलिसांनी योगेश शेटकर विरोधात लुक आउट नोटीस जारी केली. त्यानंतर शेटकरने वायफायचे बिल अदा करण्यासाठी काढलेला धनादेश वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे प्रकरण समोर आले. 

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी शेटकर याच्याकडून फेस्ताच्या फेरीचे पैसे जमा करून घेतले जातील, एकही पैसा सोडणार नाही. त्या प्रकरणातील कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटले होते. 

मात्र, त्यानंतर मुख्याधिकार्‍यांचीही बदली झाली व आता पोलिसांकडूनही काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे पालिका मंडळ हे पैसे कसे अदा करून घेणार हा प्रश्न कायम राहिला आहे.      

हेही वाचा