सासष्टी: कुंकळ्ळीतील बंद युनिट्स सुरू करण्याची परवानगी : मंत्री सिक्वेरा

अटींचे पालन न केल्यास युनिट्स कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 11:37 pm
सासष्टी: कुंकळ्ळीतील बंद युनिट्स सुरू करण्याची परवानगी : मंत्री सिक्वेरा

मडगाव : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील चार युनिट्स प्रदूषण करत असल्याच्या कारणास्तव काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यांना आता अटींवर काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 

अत्याधुनिक यंत्रणा बसवून प्रदूषण रोखण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. अटींचे उल्लंघन करत प्रदूषण झाल्यास ती युनिट्स कायमस्वरूपी बंद केली जातील, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. 

मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कुटबण जेटीवरील कामांचा आढावा घेतला. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छता गृहांसह इतर दुरुस्ती कामांवर चर्चा झाली.

 त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काम केले जावे यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून एसजीपीडीए मासळी मार्केटमधील सांडपाणी वाहिनीसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली. 

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील काम बंद करण्यात आलेल्या चार प्रकल्पांना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. काही युनिटकडून सांडपाणी प्रक्रियेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने बसवण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधीची मागणी केलेली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना अटींवर काम करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यांच्याकडून तसे न झाल्यास ती युनिट्स कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया केलेल्या पाण्याचे काय करायचे याबाबत चर्चा करतेवेळी त्या पाण्याचा वापर स्टील प्रकल्पासाठी होऊ शकतो का याचा विचार केला जाणार आहे असे सांगण्यात आले. 

त्यानुसार कुुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत किती पाण्याचा वापर होतो व किती पाणी बाहेर सोडण्यात येते याची माहिती घेऊन त्याच्या वापराबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सिक्वेरा यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोयच्या सायबावरील वक्तव्य दुर्देवी : मंत्री सिक्वेरा
सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्यावर सुभाष वेलिंगकर यांचे वक्तव्य हे दुर्देवी आहे. त्यांच्याविरोधात राज्यभरात पोलिसांत तक्रारी दाखल झालेल्या आहे. राज्य सरकारकडून योग्य ती कारवाई यावर केली जाईल. 

वेलिंगकर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत समाजाला भडकवण्याचा प्रयत्न का केला याचे कारण समजत नाही, असे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

हेही वाचा