बार्देश : दारूच्या नशेत खोल पाण्यात गेलेल्या ५ पर्यटकांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी वाचवले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 05:21 pm
बार्देश : दारूच्या नशेत खोल पाण्यात गेलेल्या ५ पर्यटकांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी वाचवले

कळंगुट : जीवाचा गोवा करण्याच्या नादात भल्या पहाटे समुद्राच्या पाण्यात जात मजा करणे केरळ मधील पाच मद्यधुंद पर्यटकांना महागात पडले.  केवळ दैव बलवत्तर होते म्हणून तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने वेळीच आपल्या टीमला याबाबत माहिती दिली व या पाच जणांना वाचवण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना आज शुक्रवारी पहाटे ६च्या दरम्यान घडली. यावेळी २५-३० वयोगटातील ५ तरुण मद्यधुंद अवस्थेत समुद्राच्या पाण्यात गेल्याची माहिती किनाऱ्यावर तैनात शुभम कळसेकर या 'दृष्टी लाईफसेव्हर'च्या जीवरक्षकास मिळाली. त्याने येथे येत या ५ जणांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. शुभमने वेळ न दडवता आपल्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली व त्यांना तयार राहण्याचा इशारा दिला. 

दरम्यान काहीवेळातच हे तरुण किनाऱ्यापासून ३० मीटर आत समुद्रात गेले व पाण्याच्या प्रवाहात अडकले. त्यांचा हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या शुभमसह नकुल उसपकर, सुजल धुरी, कार्तिक नाईक आणि रोहित हिरनाईक यांनी तत्काळ कृती करत पाण्यात धाव घेतली व रेस्क्यू ट्यूबच्या माध्यमातून या सर्वांना किनाऱ्यावर आणले . जीव रक्षकांनी प्रसंगावधान राखत योग्य कृती केल्याने या पाच जणांचे जीव वाचले.  विशेष म्हणजे सायंकाळी ६ ते सकाळी ७ पर्यंत गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पोहण्यास मनाई आहे.  

राज्यातून मान्सूनने एक्जिट घेतल्यानंतर, अधिकृतरीत्या पर्यटन हंगामास सुरवात झाली आहे. गोव्यात आता स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची आवक वाढणार. त्यांच्या आगमनाने राज्याच्या वाहतूक, कायदा सुव्यवस्था आणि इतर घटकांवर परिणाम होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दारू पिऊन कायदा मोडणाऱ्यांवर पोलीस आणि इतर घटकांना बारीक लक्ष ठेवावे लागेल.  


हेही वाचा