पणजी : चिंबल जंक्शननजीक कलंडली कदंब बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे जीव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 04:41 pm
पणजी : चिंबल जंक्शननजीक कलंडली कदंब बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे जीव

पणजी : आज सकाळी चिंबल जंक्शननजीक असलेल्या पणजी-जूने गोवे महामार्गावरील वळणावर फोंड्याहून पणजीच्या दिशेने येणारी कदंब बस कलंडली. अग्निशामक दलाच्या मदतीने यात प्रवास करणाऱ्या १० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 


मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंदब बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याकडेला असलेल्या दुभाजकाचा आधार घेत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यात त्याला अपयश न आल्याने गाडी कलंडली. दरम्यान 'पीक अवर्स'मध्ये घडलेल्या या घटनेमुळे किंचित वाहतूक कोंडी उद्भवली. 

गोव्यातील दुर्गम भागांतील लोकांसाठी मुख्य शहरात बाजाराच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणजे कदंब बस. बऱ्याचदा अंतर्गत भागात खाजगी बस सेवा देणारे पोहचतच नाहीत. एकट्या दुकट्यासाठी दुर्गम ठिकाणी जाणे त्यांना परवडत देखील नाही. पण कितीही प्रवासी असो कदंबच्या बस या दुर्गम गावांतील प्रवाशांचा कायम आधारस्तंभ राहिल्या आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून योग्य त्या मानाने गाड्यांची दुरुस्ती-देखरेख-डागडुजी न झाल्याने या गाड्यांचा खुळखुळा झाला आहे. या गाड्या ऐन कामाच्या वेळेलाच बंद पडतात, याचे हेच कारण असावे.  


दरम्यान राज्यात अपघातांचा ससेमिरा सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, रस्त्यावरील खड्डे, वळणाचा अंदाज न आल्याचे गाडीचा अपघात, किंवा दारूच्या नशेत गाडी चालवणे तसेच गाडीत उद्भवलेले तांत्रिक बिघाड यासारख्या गोष्टींमुळे राज्यात सर्रास अपघात घडतात. यावेळस चालकाने प्रसंगावधान राखत सर्वांचे जीव वाचवले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

हेही वाचा