तिसवाडी: आता मराठी राजभाषेसाठी प्रयत्न करणार - मराठी प्रेमींना निश्चय

गोव्यातही मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेल - वंसकर,

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th October, 11:45 pm
तिसवाडी: आता मराठी राजभाषेसाठी प्रयत्न करणार - मराठी प्रेमींना निश्चय

पणजी : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आता गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी संयुक्तरीत्या प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यातील मराठी प्रेमी संघटना लवकरच एक स्नेह संमेलन भरवून याबाबत पुढील धोरण ठरवणार आहेत. 

शुक्रवारी पणजीत विविध मराठी प्रेमी संघटनांनी एकत्र येत हा निश्चय केला. यावेळी रमाकांत खलप, रमेश वसकर, प्रदीप घाडी आमोणकर, दशरथ परब, किसन फडते, सागर जावडेकर, श्रद्धा खलप, आदी उपस्थित होते. 

माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांनी सांगितले की, मराठी ही गोमंतकाची जुनी परंपरा आहे. पोर्तुगीज येण्यापूर्वीही येथे मराठी होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर गोमंतकीयांवर मोठी जबाबदारी आली आहे. आपल्याला राज्यात मराठी भाषा, संस्कृती जपण्याचे काम करायचे आहे. 

सध्या राज्यात अनेक वावटळे निर्माण झाली आहेत. त्यांना आपल्याला उत्तर द्यायचे आहे. मराठी भाषा अस्सल सोने आहे. काही लोक ही आमची भाषा नसल्याचे सांगतात. मात्र तरीही त्यांच्या मनामध्ये मराठीचे संस्कार झाले आहेत. 

गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर म्हणाले की, आम्ही मराठी राजभाषेसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहोत. त्यावेळी केवळ दोन टक्के लोकांची मागणी मान्य करून कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. यामुळे बहुजनांच्या दोन पिढ्यांचे नुकसान झाले. आता मराठीला राजभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन याबाबत जागृती करणार आहोत.

गोव्यातही मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेल 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्ही गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही दरवर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ठराव घेत होतो. आज केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. येत्या काही वर्षात गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेल अशी खात्री आम्हाला आहे. - रमेश वंसकर, अध्यक्ष, गोमंतक साहित्य सेवक मंडळ

गोव्याची राजभाषा मराठीच: खलप
येत्या काही दिवसात मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती एकत्र येऊन मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहोत. अन्य कुणाला वाटत असेल की त्यांचीच भाषा राजभाषा आहे तर तो चुकीचा समज आहे. शासकीय व्यवहाराची भाषा ही राजभाषा असते. त्यामुळे मराठी ही गोव्याची राजभाषाच आहे. गोव्याचा इतिहास पाहता मराठी हीच येथील राजभाषा असल्याचे खलप यांनी सांगितले. 

हेही वाचा