राज्यातील कचऱ्यावर अभ्यासाची गरज

सगळ्या गोवाभर पसरलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने घातक परिणाम होत असावेत, अशी शंका येते. पणजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अभ्यास केला तेव्हा मायक्रो प्लास्टिक आढळून आले. त्याचप्रमाणे कचऱ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

Story: विचारचक्र |
04th October, 11:03 pm
राज्यातील कचऱ्यावर अभ्यासाची गरज

अरबी सागर आणि मांडवी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मायक्रो प्लास्टिकचे तुकडे आढळून आल्याने मासळी तसेच पाण्यातील इतर प्राण्यांवर विघातक परिणाम होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या मायक्रो प्लास्टिकचे प्रमाण असेच वाढत राहिले तर अरबी समुद्रातील मासे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या अहवालानुसार मांडवी नदी व मिरामार परिसरातील पाण्यात मायक्रो प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्याने माशांच्या शरीरात ते बारीक बारीक तुकडे मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे जाळ्यात सापडले आणि लोकांच्या स्वयंपाकघरात पोचले तर माणसांच्या पोटात जाऊ शकतात किंवा ते शिजल्यावर प्लॅस्टिकचा काही अंश मानवी शरीरात‌ प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधन संस्थेतील संशोधक, शास्त्रज्ञांच्या एका गटाने टोंक - करंझाळे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. हा अहवाल "सायन्स ऑफ द टोटल एन्विरॉन्मेट" या जागतिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 

एनआयओच्या केमिकल ओशनोग्रफी विभागातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. महुआ साहा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले होते. त्याशिवाय देशभरातील इतर काही संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञ या संशोधनात सहभागी झाले होते. त्यामुळे या संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. टोंक - करंझाळे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पणजी महानगरपालिका क्षेत्रातील तसेच बार्देश तालुक्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडण्यात येते. प्रक्रिया केलेले हे पाणी शुद्ध असते व उद्यानातील झाडांना तसेच बागायतीसाठी वापरणे योग्य आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पणजी महानगरपालिकेच्या टँकरमधून हे पाणी शहरातील उद्यानातील झाडांना दिले जाते. या पाण्यात मायक्रो प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असल्यास व झाडे शिंपण्यासाठी त्याचा वापर केला तर झाडांवर अनिष्ठ परिणाम होण्याची भीतीही आहे. ही समस्या किती गंभीर आहे व मानवी जीवनावर त्याचे कोणते परिणाम होऊ शकतात यांचा सूक्ष्म अभ्यास होण्याची गरज आहे. एनआयओ संस्थेच्या शास्त्रज्ञांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्याचा अनिष्ट परिणाम हवामानावर झाला आहे. जून‌ व जुलै महिन्यात थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली तर अंगातून घामाच्या धारा वाहायच्या. ‌आता नवरात्रोत्सव साजरा करताना घरातील ‌वीज गेल्यास अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. दसरा, दिवाळीच्या सुमारास आमच्या बालपणी कडाक्याची थंडी असायची. आज फॅन किंवा एसी चालू केल्याशिवाय झोपच येत नाही. झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली म्हणून पाऊस थांबला, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमी करायचे. गोव्यातील वृक्ष  लागवडीत कोणतीही वाढ झालेली नाही. झाडे छाटून डोंगरमाथ्यावर नव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. डोंगरकापणीच्या शेकडो तक्रारी वाढत आहेत. तरीही यंदा गोव्यात दोनशे इंचांच्या आसपास पाऊस पडला आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत पाऊस पडतोच, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आता जर पाऊस पडला तर दोनशे इंचांच्या पुढे पाऊस जाईल.

गोव्यातील कोळसा वाहतुकीवरून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची ओरड गेली कित्येक वर्षे चालू आहे. कोळसा वाहतूक बंद करा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत तर एमपीटी मुरगाव बंदर कोळसा हब करण्याची तरतूद करत आहे. गोव्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतानाही गोव्यात देशात सर्वात जास्त पाऊस पडतो. आसाममधील चेरापुंजी या भागात देशातील सर्वात जास्त पाऊस पडतो, असे आम्हाला शिकविण्यात आले होते. आता चेरापुंजी हे गाव आसाम राज्यात नाही आणि चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस गोव्यात पडतो.

वृक्षतोड आणि पावसाचा खरोखरच काही संबंध असतो काय, याबद्दल शंका निर्माण होत आहे. गेल्या दोन तीन वर्षांत गोव्यात कुठेच नव्याने झाडे लावलेली नसताना पावसाचे प्रमाण दुप्पटीने कसे वाढले? याचे शास्त्रीयदृष्ट्या संशोधन एनआयओसारख्या संस्थांनी केले पाहिजे. तसा अभ्यास केला तरच यापुढे खबरदारी घेता येईल. अन्यथा पुढील वर्षी पावसाळा सुरू झाला की आपली परिस्थिती काय होईल, हे सांगता येणार नाही.

 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पेशाने डॉक्टर आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यावरणीय समस्यांची त्यांनी गंभीर दखल घेणे आवश्यक व क्रमप्राप्त आहे. डॉ. सावंत या गंभीर विषयाची गंभीर दखल घेतील काय? 

गेल्या काही वर्षांत गोव्यातील वातावरणात बराच फरक जाणवायला  लागला आहे. गोव्यातील लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली नसली तरी गोव्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लोकसंख्येच्या दुप्पट असते. त्यामुळे मूलभूत सुविधांचा ताण वाढतो. गोवाभर  कचऱ्याच्या भल्या मोठ्या राशी सर्वत्र दिसून येतात. साळगाव ये‌थील एक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सोडला तर बाकी सर्व प्रकल्प कुचकामी ठरले आहेत. मडगावातील सोनसडो येथील कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. मडगाव शहरातील वातावरण स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याने चौगुले महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर कचरा टाकण्याची व्यवस्था केली गेली. गेली ५० - ५५ वर्षे तेथे कचरा टाकण्यात येत आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले तेव्हा मायकल लोबो यांच्या सहकार्याने साळगाव येथे सुंदर प्रकल्प हाती घेण्यात आला. पण मडगाव येथील समस्येवर ते सर्वमान्य तोडगा काढू शकले नाहीत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गेली कित्येक वर्षे आमदार आहेत. तब्बल पाच वर्षे मुख्यमंत्री होते. जगातील सगळ्यात अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता आले असते, पण तसे झाले नाही.

या सगळ्या गोवाभर पसरलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने घातक परिणाम होत असावेत, अशी शंका येते. पणजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अभ्यास केला तेव्हा मायक्रो प्लास्टिक आढळून आले, त्याचप्रमाणे राज्यभरातील कचऱ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे.


- गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)