इस्रायल-इराण युद्ध झाल्यास भारतीयांचे नुकसान

Story: विश्वरंग |
04th October, 10:05 pm
इस्रायल-इराण युद्ध झाल्यास भारतीयांचे नुकसान

इराणने १ ऑक्टोबरला रात्री इस्रायलवर अनेक बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला. इराणने इस्रायलवर या वर्षात थेट हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नरसल्लाह आणि हमासचे नेते इस्माइल हानिये यांच्या मृत्यूनंतर इराणकडून करण्यात आलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने १८१ बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला. त्यात एक पॅलेस्टिनी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर ११० बॅलेस्टिक मिसाईल आणि ३० क्रूज मिसाईलने हल्ला केला होता. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील शत्रुत्वाचे हे नवीन पर्व लवकर संपेल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचे सांगितले आहे.

इंडियन काऊंसिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स या संस्थेतील सीनिअर फेलो डॉ. फज्जुर्रहमान म्हणतात की, जर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले तर भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, युद्ध झाले तर त्याचा परिणाम फक्त इराणपर्यंतच राहणार नाही. तर अफगाणिस्तान, इराक, सौदी अरेबिया, कतार आणि यूएईपर्यंत जाणवेल. या देशांमधून भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. अशा प्रकारे हल्ले होत राहिले तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि मागणी वाढेल. अशा परिस्थितीत तेलाचे भाव वाढतील आणि भारतावर त्याचा थेट परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

भारताचे इराण आणि इस्रायल दोन्ही देशांबरोबर चांगले संबंध आहेत. भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांपैकी इराण हा कायमच आघाडीवर राहिलेला आहे. अणुचाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्बंध असतानाही भारत आणि इराणचे संबंध सुरळीत आहेत. इस्रायल हा भारताला शस्त्रे आणि तंत्रज्ञानात सहाय्य करणारा आघाडीचा देश आहे. डॉ. फज्जुर्रहमान यांच्या मते, दोन्ही देशामध्ये राजनैतिक संतुलन ठेवणे हेही भारतासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

भारतातील परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सौदी अरेबिया, यूएई, ओमान, बहरीन, कतार आणि कुवेतमध्ये सुमारे ९० लाख भारतीय आहेत. इराणबद्दल बोलायचे झाले तर ही संख्या १० हजार, तर इस्रायलमध्ये २० हजार लोक राहतात. आखाती देशाचे चलन भारतापेक्षा अधिक मजबूत असल्यामुळे त्याचा फायदा कामगारांना होतो. युद्धाच्या परिस्थितीत आखाती देशात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढणे आणि त्यांना भारतात पुन्हा स्थिरस्थावर करणे हे एक मोठे आव्हान असेल आणि ते सोपे नाही.

सुदेश दळवी