मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर यांनीही उडी घेतली. मात्र, खाली संरक्षण जाळी असल्याने त्यांचा जीव वाचला.
दोन्ही आमदार जाळ्यात अडकले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना बाहेर काढले. उंचावरून पडल्याने झिरवाळ यांच्या मानेला दुखापत झाली. त्याचा रक्तदाबही वाढला आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक मंत्रालयात पोहोचले.
झिरवाळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातील आमदार आहेत. दरम्यान धनगर समाजाला एसटीचा दर्जा देण्याबाबत शिंदे सरकारच्या निर्णयाला झिरवाळ यांचा विरोध आहे. ते आपल्याच सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. या संदर्भात झिरवाळ व इतर आदिवासी आमदारांनी शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीतून काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. झिरवाळ, खोसकर यांनी आदिवासी समाजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या घटनेनंतर मंत्रालयातील कामकाज ठप्प झाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील धनगर समाजाला ओबीसी दर्जा देण्यात आला आहे. धनगरांना भटक्या जमाती मानून त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ३.५ टक्के आरक्षण दिले जात आहे. धनगर समाजालात देशातील इतर राज्यांमध्ये ओराव, धनका आणि डोम म्हणूनही ओळखले जाते. इतर राज्यांत मात्र या समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा आहे.
महाराष्ट्रातील धनगर समाज धनगड आणि धनगर एकच असल्याचा दावा करतो. त्यांचा अनुसूचित जमातीत (एसटी) समावेश करून ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी आहे. मात्र आदिवासी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यास उपसभापती विरोध करत आहेत.