इस्रायलने आता आपली तलवार म्यान करण्याची तयारी करताना इतरांशी सौहार्दाने कसे वागता येईल त्याचा विचार करायला हवा. नाहीतरी इस्रायल निर्माण करत असलेल्या युद्धस्थितीमुळे भारतासह अन्य अनेक देशांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागतेच.
एकमेकांपासून सुमारे अडिच हजार किलोमीटर दूर असतानाही इराण आणि इस्रायल सध्या एकमेकाला भिडत आहेत. इस्रायलला संपविण्याचा पण करून इराण सध्या पेटून उठला आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नरसल्लाह आणि हमासचे नेते अस्माईल हानियो यांना इस्रायलने ठार केल्यानंतर इराण खवळला. या हल्ल्यात इराणचा एक लष्करी अधिकारीही ठार झाला होता. त्यामुळे इराण जास्त खवळला. या सगळ्या गोष्टींचा वचपा काढण्यासाठी इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलचे हल्ले केले. इराण इस्रायलला नष्ट करण्यासाठी इतर मुस्लिम देशांची मदत घेत आहे, तर इराणला संपविण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी या इराणने मोठी चूक केली आहे त्यामुळे त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असे स्पष्ट केले आहे. यहुदींचा देश अशी ख्याती असलेल्या इस्रायलच्या मदतीला तूर्तास अमेरिका आहे. कारण हा देश मुस्लिम देशांनीच चहूबाजूंनी घेरलेला आहे. इराण - इस्रायल यांच्यातील संघर्ष मोठ्या युद्धाचे स्वरूप घेतो की हा तणाव पुढील काही काळात शांत होतो ते पहावे लागेल. या दोन्ही देशांतील तणाव हा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका देऊ शकतो. त्यामुळे हे युद्ध टळणे आवश्यक आहे. अनेक देशांच्या तेल पुरवठ्यावर परिणाम सुरू झाले आणि तेलाच्या किमतीही वाढत आहेत. शेअर बाजारावर युद्धामुळे ढग तयार झाले आहेत. एकूण या दोन देशांमधील तणाव वाढला तर पुढे बऱ्याच गोष्टींचा सामना करण्याची वेळ भारतासह अनेक देशांवर येऊ शकते. यापूर्वीही एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला होता. यावेळीही इराणने इस्रायलला धडा शिकवण्याच्या हेतूनेच हल्ला केला आहे. त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने सध्या इराणचे हल्ले परतवून लावतानाच इराणवरही हल्ले सुरू केले आहेत. दोन्ही देशांच्या हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत. दोन्ही देशांमध्ये आता तह होण्याची शक्यता कमीच दिसते. त्यातच काही मुस्लिम देशांना अमेरिकेचा राग असल्यामुळे इस्रायलला इराणसह इतर देशांचाही रोष पाहण्याची वेळ येऊ शकते.
इस्रायलने आपले लक्ष्य बनवलेल्या हिजबुल्लाह, हुथी आणि हमास यांना दहशतवादी संघटना म्हणूनच अमेरिका आणि इस्रायल पाहते. त्यामुळे या संघटनांच्या नेत्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न नेहमीच इस्रायल करत आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायलने वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या शेकडो म्होरक्यांना, पदाधिकाऱ्यांना कंठस्नान घातले. अगदी चित्रपटाचे कथानक शोभेल अशा पद्धतीने इस्रायलने दहशतवाद्यांना ठार केले आहे. मोबाईलचा स्फोट करून मारण्यापासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये अशा नेत्यांना लक्ष्य करून संपवले. इस्रायल नेहमीच आधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान, लष्करी यंत्रणा अशा गोष्टींना जास्त प्राधान्य देत आले आहे. त्याचाच फायदा उठवत इस्रायल नव्या तंत्रज्ञानांचा वापर करून स्फोट घडवून आणत असते. लेबनॉन आणि सिरियात हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना गेल्या दोन आठवड्यांपूर्वी पेजरच्या स्फोटानेच मारण्याचा प्रयत्न झाला. त्यात काहीजण ठार झाले तर तीन हजारांच्या आसपास लोक जखमी झाले होते. काही वर्षांपूर्वी मोबाईलचा स्फोट घडवून दहशतवादी संघटनेच्या एका नेत्याला ठार मारले होते. इस्रायलने दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना आणि दहशतवादी कारवायांमध्ये असलेल्यांना नेहमीच लक्ष्य केले, पण त्यांना मारण्याच्या प्रयत्नांत सामान्य नागरिकांचा जीव जाऊ लागल्यामुळे जगभरातून इस्रायलला अनेकांची नाराजीही पहावी लागली. आजही इस्रायल चुकत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. देश म्हणून शाबूत राहण्यासाठी जे जे करावे लागते ते कुठलीही तमा न बाळगता किंवा कोण काय म्हणतो त्याकडे लक्ष न देता इस्रायल करत आला आहे. इस्रायलचा संघर्ष कालही होता आणि आजही आहे. त्यामुळे नेहमी दहशतवादाशी लढत राहण्याच्या निमित्ताने देश धगधगत ठेवावा का, असा सर्वात मोठा प्रश्न आज इस्रायलसमोर आहे. इस्रायल अशी काही समस्या आपल्यासमोर नाही असेच दाखवत असला तरीही शेजाऱ्यापाजाऱ्यांशी घेतलेले वैर इस्रायलला शांतपणे देश नक्की चालवू देणार नाही. इस्रायलने आता आपली तलवार म्यान करण्याची तयारी करताना इतरांशी सौहार्दाने कसे वागता येईल याचा विचार करायला हवा. नाहीतरी इस्रायल निर्माण करत असलेल्या युद्धस्थितीमुळे भारतासह अन्य अनेक देशांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागतेच.