छोटे बदल, मोठी आशा

संवेदन केंद्राला अन् या कातकरी समाजाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काम भरपूर आहे. या इवल्याशा बदलांनी हुरळून जाता कामा नये, हे ज्ञात आहे. तरी या खडतर प्रवासातील काही ओएसिस गारव्याची अनुभूती देणारे आहेत.

Story: विचारचक्र |
03rd October, 11:39 pm
छोटे बदल, मोठी आशा

संवेदन केंद्र या साखळीतील स्वयंसेवी संस्थेचे काम कातकरी (वानरमारे) समाजात जोमाने सुरू आहे. त्यासाठी लागणारे शारीरिक व बौध्दिक श्रम कार्यकर्ते घेत आहेत. आर्थिक भार आमचे संवेदनशील सहकारी व समाजातील दानी व्यक्ती घेत आहेत. चिवटपणे करीत असलेल्या या नियोजित विधायक कार्याचा परिपाक काळ्यातून पांढरे यासारखा ठळक बदल घडत नाही वा तसा दृष्टीस पडत नाही. तरीही जे काही थोडे थोडके बदल होत आहेत, ते स्वागतार्ह ठरवून कातकरी समाजाला प्रोत्साहन देण्याचे काम संवेदन केंद्र करीत आहे. 

शहीद नाग्या म्हादू कातकरी या युवकाने चिरनेरच्या जंगल सत्याग्रहात आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तो स्मृतिदिन संवेदन केंद्राचे कार्यकर्ते गेली सात वर्षे साजरा करीत आहेत. त्या निमित्ताने कातकरी समाजामध्ये स्वाभिमान व आत्मविश्वास रुजावा हा हेतू. आपणही या देशाच्या निर्माण प्रक्रियेचा भाग होतो, याची जाणीव कातकऱ्यांना व्हावी हा हेतू.

या क्षणाचे औचित्य साधून यंदा कातकरी वस्तीवर काही लोकांचे सत्कार करण्यात आले. नागरी समाजाच्या दृष्टीने हे सत्कार काही त्यांनी मोठे यश संपादन केले म्हणून नव्हे, तर स्वत:च्या परिघात फिरता फिरता त्यांनी टाकलेल्या एका बदलाच्या पावलासाठी होते. हे त्यांचे योगदान समाजातील प्राथमिक बदलासाठी गणले जाणारे आहे. 

कातकरी समाजाची पार्श्वभूमी लक्षात घेताना असे आढळते की इथे १८ किंवा २१ हे लग्नाचे वय नाही. १२ ते १७ वर्षांपर्यंत कधीही मुलामुलींची लग्ने जमवली जातात. मुलगा काम करण्यायोग्य झाला की त्याला अनुरूप मुलगी शोधली जाते. दोन्ही घरांमध्ये लेनदेन होते व हा व्यवहार पक्का केला जातो. एक दोन वर्षांनंतर कधीतरी त्याचे लग्न करून देतात. कायद्याच्या दृष्टीने हा बालविवाह आहे. तो गुन्हा असला तरी तो अजून या समाजात आहे. याला अनेक कारणे आहेत. याविषयी सतत संवाद साधताना मुलांशी बोलणे, महिलांशी बोलणे चालू केले. सततच्या चर्चेमुळे असो किंवा आमच्या थोड्याशा धाकामुळे काही मुलांनी आपण २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय घेतला. पालकांनी स्वत:च्या नजरेने अनुरूप मुलगी घरात आणून ठेवली, मुलावर दबाव टाकला तरी दोन मुलगे त्याला बळी पडले नाहीत. आपल्या पालकांना त्यांनी निक्षून सांगितले की, आम्ही २१ वर्षे वयापर्यंत लग्न करणार नाही. नाईलाजाने पालकांना मुलींची परत पाठवणी करावी लागली. त्या दोन मुलांचा सत्कार गावच्या सरपंचांच्या हस्ते संवेदन केंद्राने घडवून आणला. तसेच लवकर मुलींची लग्ने झाल्या करणाने त्या लवकर गरोदर राहतात. लवकर गरोदर झाल्याने त्या स्वत: अशक्त बनतात. परत दुसरे, तिसरे गरोदरपण लगेच एकापाठोपाठ येत असल्याने त्यांची मुलेही अशक्त व कुपोषित जन्माला येतात. हे रोखण्यासाठी कायम संवाद व चर्चा महिलांसोबत चालू होती. त्यासाठी महिलांचा संपर्क काही डॉक्टर महिलांकडे वाढवला. जागृती कार्यक्रम घेतले. सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेऊन तिथल्या डॉक्टरांकरवी माहिती दिली. असे अनेक प्रयत्न केल्यानंतर वस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा महिलांनी कॉपर टी या गर्भनिरोधकाचा वापर करून कुटुंब नियोजन केले. स्वत:च्या मुलांचे योग्य संगोपन, आपल्या आरोग्याची काळजी व नियोजित गरोदरपण या तिन्ही गोष्टी यातून साध्य झाल्या. हे इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरावे आणि या महिलांनी टाकलेल्या या एका बदलाच्या मोठ्या पावलासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. 

कातकरी समाज हा भटका विमुक्त समाज आहे. सतत भटकंती करीत राहणे ही त्यांची परंपरा आहे. गेल्या दीड दशकापासून ही वस्ती निरंकाल येथे तात्पुरत्या झोपड्या बांधून राहत आहे. आजूबाजूच्या कुळागरांमध्ये, काजू बागायतीत हे लोक रोजंदारीवर कामाला जातात. तरीही हातावरची कमाई कायम नसते. त्यामुळे अल्प मोबदल्यात दीर्घ रोजगार मिळणारी रोजंदारी म्हणजे ऊस कापायला जाणे. ऊस तोडायला जाताना चार महिने हा समाज स्थलांतर करतो. जाताना कपडे, स्वयंपाकाचे सामान, कुत्री, मांजरे, मुले सगळाच लवाजमा सोबत घेऊन जातात. मुलांना नेत असल्याने त्यांची चार महिने शाळा बुडते. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. एरवी ही पहिली पिढी शिकणारी आहे. त्यांना शिक्षणातील खूप काही समजते असे नाही, तरीही ही मुले परत येतात तेव्हा अगोदर शिकवलेले सगळे ती विसरतात. पुन्हा पहिल्या पानावरून पुढे सुरुवात करावी लागते. शिवाय शाळेची हजेरी भरत नाही. अशा परिस्थितीत २६८ दिवस फक्त शाळेत हजेरी लावली असल्याने दोन छोट्यांचा सत्कार करण्यात आला.

 मुलांनी शाळेत गेले पाहिजे ही तळमळ पालकांना नाही. त्याचे कारण मुलगा जरा मोठा झाल्यावर रोजंदारीला कामाला गेला तर काहीतरी कमवून आणतो. शाळेत गेल्यानंतरचा फायदा पटकन लक्षात येत नसतो. दीर्घकालीन लाभाची कल्पना करणे त्यांना माहीत नाही. त्यामुळे मुलांनी शाळेत जाणे यासाठी पालक आग्रही नसतात. अशा पार्श्वभूमीवर स्वत:च्या चारही मुलांना नियमित शाळेत पाठवणाऱ्या व त्यांनी शाळेला दांडी मारू नये यासाठी दक्ष असणाऱ्या आईचा सत्कार केला. हे करणे त्या आईसाठीही महत्वाचे होते, त्यासोबत इतर पालकांनाही विचार करायला लावणारे आहे.

व्यसन हा कातकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असताना आम्ही त्यात खो घातला म्हणायला हरकत नाही. प्रत्येक चर्चेच्या वेळी, कार्यक्रमाला, प्रत्यक्ष संवादातून इतरांकडून सर्व प्रकारे प्रयत्न करून काही लोकांनी पान तंबाखू खाणे सोडले. अशी जोडपी व व्यक्तींना गौरविण्यात आले.

 संवेदन केंद्राला अन् या कातकरी समाजाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काम भरपूर आहे. या इवल्याशा बदलांनी हुरळून जाता कामा नये, हे ज्ञात आहे. तरी या खडतर प्रवासातील काही ओएसिस गारव्याची अनुभूती देणारे आहेत, तसे वाटून इतरांनाही तो अनुभव द्यावा म्हणून हा प्रपंच.


- नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या 

व साहित्यिक आहेत.)