निवडणुकीत भाजप-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

Story: राज्यरंग |
03rd October, 11:37 pm
निवडणुकीत भाजप-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

हरियाणात उद्या, ५ ऑक्टोबर रोजी ९० मतदारसंघांत एकाच टप्प्यात मतदान होत आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३५ जागांवर विजय नोंदवून भाजपने सरकार स्थापन केले होते. काँग्रेसलाही २८ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ५ जागा दिल्या. सध्या भाजपचे सरकार असले तरी काँग्रेसचे नेते यावेळी जनता आपल्याला कौल देईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. जनतेने कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले हे ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेल्या माहितीवरून असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने आपला अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालानुसार, गुन्हेगारी खटले असलेले उमेदवार आपमध्ये सर्वाधिक आहेत. भाजपचे कॅप्टन अभिमन्यू आणि काँग्रेसचे रोहताश सिंह सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. दुसऱ्या बाजूला पाच उमेदवार असेही आहेत, ज्यांच्याकडे मालमत्ता नाही. गुन्हेगारी प्रकरणे घोषित केलेले आपकडे २३ उमेदवार आहेत. त्यांपैकी १४ जणांवर खून, बलात्कार, लहान मुले आणि महिलांवरील गुन्हे आणि भ्रष्टाचारासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या १७ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. इंडियन नॅशनल लोक दलाचे ९, जननायक जनता पक्षाचे ७, बहुजन समाज पक्षाचे ३ आणि भाजपचे ६ उमेदवार गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेले आहेत. सर्वेक्षणामध्ये एकूण १,०३१ पैकी १,०२८ उमेदवारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. पैकी १३३ उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. एकूण ४८६ उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता पाचवी ते बारावीदरम्यान असल्याचे घोषित केले आहे. ४९२ उमेदवारांचे शिक्षण पदवी किंवा त्याहून अधिक आहे. २६ उमेदवार डिप्लोमाधारक, तर ८ जणांनी स्वतःला फक्त साक्षर घोषित केले आहे. १५ जणांनी स्वतःला निरक्षर घोषित केले आहे. एकाने शैक्षणिक पात्रता उघड केलेली नाही.

बल्लभगड मतदारसंघात भाजपचे मूलचंद शर्मा आणि त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ पराग शर्मा काँग्रेसकडून रिंगणात आहेत. अटेलीमध्ये इनोले-बसप युतीचे ठाकूर अतरलाल यांचा सामना अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या त्यांच्या सून साधना यांच्याशी होत आहे. रानियामध्ये देवीलाल कुटुंबातील नातू अर्जुन चौटाला (इनोले) आजोबा रणजित चौटाला (अपक्ष) यांच्याविरुद्ध लढत आहे. माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांची नात श्रुती (भाजप) आणि नातू अनिरुद्ध चौधरी (काँग्रेस) तोशाममधून रिंगणात आहेत. बहादूरगडमध्ये राजेंद्र जुने (काँग्रेस) आणि राजेश जुने हे काका-पुतणे मैदानात आहेत.

प्रदीप जोशी