इस्रायल : इराणने इस्रायलवर डागली १००हून अधिक क्षेपणास्त्रे

इस्रायली नागरिकांना बॉम्बशेल्टरमध्ये लपण्याचा सल्ला


02nd October, 12:20 am
इस्रायल : इराणने इस्रायलवर डागली १००हून अधिक क्षेपणास्त्रे

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
तेल अवीव : इराणने मंगळवारी सायंकाळी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजत आहेत. इराणकडून त्यांच्या देशावर रॉकेट डागण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे. लष्कराने सर्वांना बॉम्बशेल्टरमध्ये लपण्याचा सल्ला दिला आहे. इराण लवकरच इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करणार असल्याची माहिती अमेरिकेने काही तासांपूर्वीच दिली होती. इस्रायलच्या संरक्षणासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचेही अमेरिकेने सांगितले होते. इराणने याआधीच इस्रायलला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.
इराणकडून क्षेपणास्त्र गोळीबार सुरूच आहे. ‘पुढील सूचना मिळेपर्यंत तुम्हाला सुरक्षित क्षेत्रात राहण्यास सांगण्यात आले आहे’, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. क्षेपणास्त्राला रोखणाऱ्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या टक्करमुळे देशभरात स्फोटाचा आवाज निर्माण होत आहे. तेल अवीव, मृत समुद्राजवळ, दक्षिणेला आणि शेरॉन परिसरात रॉकेट मारल्याची नोंद आहे. अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. तथापि, सर्व इस्रायलींना आश्रयस्थानांमध्ये लपण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या हल्ल्यानंतर इराणने निवेदन जारी केले आहे. इस्माईल हानिया आणि नसरल्लाह यांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिका तयार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आणि या भागातील अमेरिकन सैन्याचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका इस्रायलला मदत करण्यास तयार आहे. बायडेन यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमशी याबाबत विचारविनिमय केला.