प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयातील कॉरिडोरमधील महिलांच्या शरीराला स्पर्श करत विनयभंग केल्याप्रकरणी संशयित वकील प्रितेश प्रभू याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली होती. फातोर्डा पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित अॅड. प्रितेश प्रभू याने सोमवारी सकाळी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयातील सी कोर्ट रुमच्या बाहेरील कॉरिडोरमध्ये दोघा युवतींचा विनयभंग केला. त्यानंतर त्याठिकाणाहून पळून गेला. याप्रकरणी फातोर्डा पोलीस ठाण्यात पीडितांकडून गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर संशयित प्रितेश प्रभू याला अटक करण्यात आली. यापूर्वी मडगाव पोलिसांत संशयित प्रभू विरोधात लैंगिक छळाची तक्रार नोंद झाली होती. त्याचवेळी संशयिताला अटक करण्यात आली असती तर हा प्रकार घडला नसता. मात्र, त्यावेळी नोटीस बजावून संशयिताला सोडण्यात आले होते.
मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास फातोर्डा पोलीस उपनिरीक्षक रियांका नाईक करत आहेत.