किष्किंधा कांड हा रामायणातला एक महत्त्वाचा भाग. याच भागात सीताहरणानंतर तिचा शोध घेत व्याकूळ झालेला श्रीराम हनुमान, सुग्रीव आणि त्यांच्या वानरसेनेला भेटतो. त्यानंतर सीताशोध मोहीम वेग पकडते. रूढार्थाने दिन्जीत आय्यतन दिग्दर्शित ‘किष्किंधा कांडम’ हा नवा मल्याळम सिनेमा रामायणाशी थेटपणे संबंधित नाही. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या अवघडलेल्या नातेसंबंधांची आणि गुंतागुंतीच्या मनोव्यापाराची कथा मांडताना ‘हरवलेल्या गोष्टींचा शोध घेणे’ हे पौराणिक कथेशी साधर्म्य असलेले एकमेव रूपक दिग्दर्शक दिन्जीत आणि लेखक बाहुल रमेश यांनी केंद्रस्थानी ठेवले आहे.
सिनेमाची कथा सुरू होते ती केरळमधल्या एका छोट्याश्या गावात. या गावात वनविभागात काम करणारा अजयन आपल्या वडलांसोबत राहतो. अजयच्या पहिल्या बायकोचे काही वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झाले असून, त्याचा चाचू हा १० वर्षांचा लहान मुलगाही कित्येक वर्षांपासून बेपत्ता आहे. मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अजयनचे वडील अप्पू पिल्लई एक निवृत्त सैन्यदल अधिकारी आहेत. अजयच्या गावात निवडणुका असल्याने स्थानिक प्रशासनाकडून रहिवाश्यांकडे असलेल्या बंदुकी जमा करण्याचे आवाहन केले जाते. पण वयानुसार विसरभोळेपणाच्या आहारी गेलेल्या अप्पू पिल्लईंना त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर सापडत नाही. अप्पू पिल्लईंच्या विक्षिप्त आणि कडक शिस्तीच्या स्वभावामुळे त्यांच्या नकळत अजयनची नवी बायको अपर्णाही समांतरपणे त्या रिव्हॉल्व्हरचा शोध घेऊ लागते. ही रिव्हॉल्व्हर शोधत असताना अपर्णाला तिच्या या नव्या कुटुंबाचा धक्कादायक इतिहास हाती लागत जातो. ते रिव्हॉल्व्हर गहाळ झालेले असते की जाणीवपूर्वक केलेले असते? चाचू सापडतो का? चाचू आणि रिव्हॉल्व्हर बेपत्ता होण्यामागे नक्की कोण कारणीभूत असते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिग्दर्शक दिन्जीतने धक्कातंत्राचा प्रभावीपणे वापर केलेला आहे.
मल्याळम सिनेमातल्या थरारपटांमध्ये गेल्या काही वर्षांत संख्यात्मक आणि गुणात्मक अशी दोन्ही पद्धतीने वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे, या सिनेमांना बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवरही चांगला प्रतिसाद मिळतोय. अजयनची भूमिका साकारणारा गुणी अभिनेता असिफ अली, अप्पू पिल्लईच्या भूमिकेत रंग भरणारे विजयराघवन आणि अपर्णाची भूमिका वठवणारी अपर्णा बालामुरली या त्रिकुटाच्या अभिनयाने सिनेमाची रंगत आणखीनच वाढवली आहे. प्रथमदर्शनी एका रिव्हॉल्व्हरचा शोध यापुरतीच मर्यादित असलेली ही कथा नातेसंबंधांमधील पुरुषी वर्चस्ववादावर शेलक्या भाष्य करते. अभिनेता आसिफ अलीच्या कारकिर्दीतला आजवरचा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा अजूनही थिएटरमध्ये गर्दी खेचतो आहे, हे विशेष!