नांदतं घर

Story: छान छान गोष्ट |
22nd September, 04:59 am
नांदतं घर

घारुअण्णा आपल्या लेकीच्या गावी, नांदगावला गेले. घारुअण्णांना पाहताच लेकीची दोन्ही मुलं सई व सात्विक येऊन त्यांना बिलगली. लेकीने त्यांना हातपाय धुवायला पाणी आणून दिलं, ताज्या दुधाचा चहा आणून दिला. 

चहा पितापिता घारुअण्णांनी सभोवार पाहिलं. लेक एकत्र कुटुंबात दिली होती. लेकीच्या एकत्र कुटुंबाचा घारुअण्णांना कोण अभिमान! ज्याला त्याला ते आपल्या लेकीच्या सासरवाडीबद्दल कौतुकाने सांगायचे. तिघा भावांच्या एकोप्याचं गुणगान गायचे. ते येताना लेकीच्या मुलांसोबत तिच्या दिराच्या मुलांनाही रेवड्या घेऊन यायचे.

नेहमी किलबिल करणारा लेकीचा वाडा आज शांत शांत होता. घारु अण्णांनी कानोसा घेतला, नातवंडांकडे वळून म्हणाले, “का रे, तुमची भावंडं राधी, प्रल्हाद, नि सागर कुठं आहेत?” सात्विक आईकडे बघत म्हणाला, “घारुआबा, बाबांचं नि काकांचं कायतरी भांडण झालं. तेव्हापासनं बाबा काकांशी बोलत नाहीत. आई काकीशी बोलत नाही आणि आम्हां मुलांनाही एकत्र खेळण्याची बंदी घातलीय.”

इतक्यात घारुअण्णांचा जावई येऊन त्यांच्या कडेला बसला, तशी मुलं चिडीचूप झाली. जावयाने घारुअण्णांना घरची ख्यालीखुशाली विचारली, पानसुपारी देऊ केली. मुलं मात्र कोमेजलेल्या फुलांसारखीच दिसत होती.

डोक्यावरला फेटा काढून बाजूला ठेवत घारुअण्णा म्हणाले, “बरं का पोरांनो, ही चिंचेच्या झाडाखाली पाखरं बघताय ना तपकिरी रंगाची? त्यांना सातभाई म्हणतात. हे पक्षी कधी एकेकटे नाही दिसणार तुम्हाला. थव्यानेच फिरतात. गवताच्या बिया, तिथल्या अळ्या खाऊन पोटं भरतात.” मुलं घारुअण्णांचं बोलणं कुतुहलाने ऐकत होती, हे पक्षी तर मुलं नेहमी पहात पण त्यांच्याबद्दल विशेष असं त्यांना कुणी सांगितलं नव्हतं. तितक्यात पाचोळ्यातनं काहीतरी सळसळलं नं वरती झाडाच्या शेंड्याला बसलेला सातभाई विशिष्ट सुरात आपल्या भावंडांना सावध करू लागला. अळ्या मटकावण्यात गुंग असणारे सातभाईपक्षी सावध झाले नि एकसाथ उडाले, सळसळणाऱ्या प्राण्याची शिकार हुकली.

घारुअण्णा म्हणाले, “बघितलंत? याला म्हणतात एकीचं बळ. हे सातभाई एकत्र रहातात. यांच्यातही भांडणं होतात पण पुन्हा हे आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र येतात, एकोप्यानेच रहातात कारण त्यांना ठाऊक आहे, एकत्र राहिलो की आपण कुठल्याही संकटाला सहज तोंड देऊ शकतो. बलाढ्य शत्रूलाही हरवू शकतो. एकजुटीचं महत्त्व या इवल्या पाखरांना कळतं ते बुद्धीमान मनुष्याला का कळत नाही बरं!”

सासऱ्याच्या बोलण्याचा रोख जावयाला कळला. तो म्हणाला, “घारुअण्णा, शिवारातल्या कामांवरनं आमचं भावाभावांचं थोडं वाजलं होतं पण मी ते अधिकच ताणलं. चुकलंच माझं.” 

इतक्यात घारुअण्णांच्या बोलण्याकडे आतल्या खोल्यातनं कान लावून असणारे थोरला नं मधला दोघेही बाहेर आले. तिघं भाऊ मिळून घारुअण्णांच्या पाया पडले. जावाजावा एकमेकींकडे पाहून हसू लागल्या नि मुलं पुन्हा एकत्र खेळू लागली, सातभाईंसारखी कल्ला करू लागली. 

नांदतं घर पाहून घारुअण्णांचा जीव सुपाएवढा झाला.


- गीता गरुड