गणेश चतुर्थी काळात वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यात यश
पणजी : राज्यातील वाहतूक कोंडीच्या घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ट्रॅक’ यंत्रणेचा मोठा फायदा होत आहे. गणेश चतुर्थी काळात अनेक भागांतील वाहतूक कोंडीच्या घटना रोखून वाहतूक सुरळीत करण्यात या यंत्रणेचा लाभ झाल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ‘गोवन वार्ता’ला दिली.
जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याला देश-विदेशातील लाखो पर्यटक बाराही महिने भेट देत असतात. याशिवाय राज्यातही वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहन चालकांना अंतर्गत आणि मुख्य मार्गांवर बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्याच्या हेतूने वाहतूक पोलीस खात्याने आल्तिनो येथील मुख्यालयात ‘ट्रॅक’ यंत्रणा सुरू केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २७ ऑगस्ट रोजी या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला होता.
दरम्यान, गणेश चतुर्थी काळात राज्यातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी या यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. शिवाय वारंवार वाहतूक कोंडी होणारे मार्ग निश्चित करून त्यावर देखरेख ठेवण्यात आली होती. चतुर्थी काळात ज्या मार्गांवर वाहतूक कोंडी होईल, तेथील स्थानिक पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून वाहतूक कोंडीवर काहीच तासांत नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आल्याची माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आगामी काळात या यंत्रणेमध्ये अधिकाधिक सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न खात्याने सुरू केलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या घटना निश्चित कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.