हरमल माजी सरपंचांची अपात्रता याचिका न्यायालयाने फेटाळली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th September, 12:19 am
हरमल माजी सरपंचांची अपात्रता याचिका न्यायालयाने फेटाळली

पणजी : कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी अधिकृत पदाचा लाभ घेण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने हरमलचे माजी सरपंच बर्नार्ड फर्नांडिस याची अपात्रता आव्हान याचिका फेटाळून लावली. याबाबतचा आदेश पणजी येथील प्रधान सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी दिला.
गिरकरवाडा, हरमल येथे विकास प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम प्रकाराशी खुद्द माजी सरपंच बर्नार्ड फर्नांडिस निगडित असल्याचे समोर आल्यानंतर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकांद्वारे स्वेच्छा दखल घेतली होती. त्यानंतर गिरकरवाडातील किनारी परिसरात १८७ आस्थापनांकडे पंचायतीची कोणतीच परवानगी नसल्याचे समोर आले. याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने पंचायत खात्याला चौकशी करून फर्नांडिस याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते. याची दखल घेऊन पंचायत संचालनालयाने कारवाई करत फर्नांडिस याला सरपंच पदावरून हटवले. तसेच सरपंच पदाचा ताबा उपसरपंचाकडे दिला. त्यानंतर फर्नांडिस याने उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच फर्नांडिस यांनी सरपंच पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर पंचायत उपसंचालनालयाने फर्नांडिस याला हरमल पंचायतीचे पंच सदस्य पदावरून काढून टाकले. तसेच त्याला पंचायतीचे तीन निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले होते. त्यानंतर पंचायत संचालनालयाने फर्नांडिस याला पाच वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले. या आदेशाला फर्नांडिस याने प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून पंचायत संचालनालयाचा आदेश रद्द करण्यास नकार देत आव्हान याचिका फेटाळून लावली.             

हेही वाचा