यु-८ आशियाई, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
पणजी : गोव्याचा उदयोन्मूख बुद्धिबळपटू प्रयांक गावकर याने नुकतेच म्हैसूर येथे आयोजित ३७ व्या अंडर-७ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे स्थान पटकावून रौप्यपदक मिळविले आहे. या विजेतेपदामुळे प्रयांक गावकर याने २०२५ मध्ये होणाऱ्या आगामी यु-८ आशियाई आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
कर्नाटक बुद्धिबळ संघटनेने अखिल भारत बुद्धिबळ महासंघाच्या वतीने १ ते ५ सप्टेंबर दरम्यान म्हैसूर येथे ३७ व्या अंडर-७ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २८ राज्यांतून ३८२ युवा बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत प्रयांकने एकमेव दुसरा राऊंड सोडल्यास सर्व आठ राऊंड जिंकून ८ गुणांची कमाई करीत रौप्यपदक जिंकले. त्याने स्पर्धेत रौप्यपदकासह ६५ एलो गुणांची कमाई केली. प्रयांक याने सातव्या राऊंडमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अगर्थ मिश्रा आणि अयांष सिंग यांचा पराभव केला. केरळच्या काल्लीयथ देवनारायणन यांनी सर्व डाव जिंकत ९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पश्चिम बंगालचा आराध्यो गुईन याने ७.५ गुणांसह कांस्यपदक मिळविले.
प्रयांक गावकर मडगाव येथील मनोविकास इंग्लिश स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशिष केणी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या जेतेपदाबद्दल प्रयांक गावकर याचे अभिनंदन केले आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशिष केणी, सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दामोदर जांबावलीकर, बुद्धिबळ प्रशिक्षक प्रकाश सिंग, सुरज, प्रयांक याचे पालक प्रदीप आणि प्रियांका यांनी रौप्यपदक विजेत्याचे मडगाव येथे जोरदार स्वागत केले.