गुंतवणूकदार १२ सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकतील
मुंबई : पी एन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO आज १० सप्टेंबर रोजी उघडला आहे. या IPO साठी गुंतवणूकदार १२ सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स १७ सप्टेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सूचीबद्ध केले जातील.
पीएन गाडगीळ ज्वेलर्सला या इश्यूद्वारे एकूण १,१०० कोटी रुपये उभे करायचे आहेत. यासाठी, कंपनी ८५० कोटी किमतीचे १७,७०८,३३४ शेअर्स जारी करत आहे. तर कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार २५० कोटी किमतीचे ५,२०८,३३३ शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजेच OFS द्वारे विकत आहेत.
किमान आणि कमाल किती रक्कम गुंतवली जाऊ शकते?
पीएन गाडगीळ ज्वेलर्सने इश्यूची किंमत ४५६ रुपये ते ४८० रुपये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच ३१ शेअर्ससाठी बोली लावू शकतात. तुम्ही ४८० रुपयांच्या IPO च्या वरच्या प्राइस बँडवर १ लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला १४८८० रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागेल. तर, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी म्हणजेच ४०३ शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना अप्पर प्राइस बँडनुसार १९३,४४० रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असेल.
३५ टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे
कंपनीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) इश्यूचा ५० टक्के भाग राखीव ठेवला आहे. याशिवाय,३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि उर्वरित १५ टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव आहे.
पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचा ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम ३७.५%
IPO उघडण्याआधी, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ३७,५ टक्के म्हणजेच १८० रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमवर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, ४८० रुपयांच्या वरच्या किंमत बँडनुसार, त्याची एकंदरीत किंमत ६६० रुपयांपर्यंत असू शकते. शेअरची किंमत ग्रे मार्केट किमतीपेक्षा वेगळी असते.
पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडची स्थापना २०१३ मध्ये झाली. कंपनी PNG ब्रँडखाली सोने, चांदी, प्लॅटिनम आणि हिऱ्यांसह अन्य मौल्यवान दागिने विकते. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत, कंपनीची एकूण ३३ स्टोअर्स होती, यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील १८ शहरांमध्ये ३२ स्टोअर्स आणि यूएस मधील एका स्टोअरचा समावेश आहे.
जेव्हा एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सर्वसामान्यांसाठी जारी करते तेव्हा त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO म्हणतात. कंपनीला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज आहे. अशा स्थितीत बाजारातून कर्ज घेण्याऐवजी कंपनी काही शेअर्स लोकांना विकून किंवा नवीन शेअर्स देऊन पैसा उभा करते. यासाठी कंपनी IPO आणते.